Join us

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला येणार वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:12 AM

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला  चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला  चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीस खासदार संजयकाका पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसेच विविध विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.

जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यात जोखीम गृहित धरुन जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत  म्हणाले की,  याशिवाय, नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३७ सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजार ६४३ कोटी रुपये खर्च येणार असून, सिंचनक्षमता वृद्धीसाठी १५५ प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ५ हजार ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

पहिल्या टप्प्यात ही सुमारे १० हजार कोटींची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ३८ अपूर्ण प्रकल्प पूर्णत्त्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण १५ हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बळीराजा जलसंजीवनी योजना तसेच प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. आता नव्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीने पूर्ण करता येईल. शिवाय, नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पराज्य सरकारवर्ल्ड बँकसरकारमराठवाडादुष्काळपाणीदेवेंद्र फडणवीस