कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळितास आलेल्या ऊस बिलाची प्रती टन रु. ३१००/- प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सभासद शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे.
त्यांच्या पश्चात अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा. या हंगामात व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनामुळे गाळप क्षमतेइतका ऊस पुरवठा करण्याइतकी पुरेशी यंत्रणा उपलब्ध झाली आहे.
व्यवस्थापनाने या गळीत हंगामासाठी अकरा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिक वाचा: अडचणीत असलेल्या गुऱ्हाळ उद्योगात सुभाष पाटलांनी निर्माण केला नवा आदर्श; वाचा सविस्तर