सोमेश्वरनगर: संचालक मंडळाने कारखान्याकडे नोंदविलेला ऊस बाहेरील कारखान्यास घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऊसतोडीसाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्यास ऊसतोडणी कामगाराच्या बिलातून ते पैसे वसूल केले जातील.
त्यामुळे ऊस तोडीसाठी कोणीही पैसे देऊ नयेत. शेतकऱ्यांची सहमती नसताना ऊस जळीत केल्यास कारखान्याकडे लेखी तक्रार करावी, असे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, राज्य सरकारने यावर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे १५ दिवस सोमेश्वर कारखाना उशिरा चालू झाला.
असे असतानाही सोमेश्वरकडे नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप २० मार्च ते २५ मार्चपर्यंत संपवणार असून नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे.
सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. सोमेश्वरकडे इतर कारखान्यांच्या तुलनेने समाधानकारक उसाचे क्षेत्र आहे.
तसेच बाजूच्या अनेक कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने त्यांना उसाची कमतरता भासू लागल्याने व ऊस लवकर नेण्याचे प्रलोभन दाखवून अनेक सभासदांना ऊस बाहेर घालण्यास बळी पाडले आहे.
अशा तात्पुरत्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतःचे आर्थिक नुकसान करून कारखान्याकडे नोंदलेला ऊस बाहेर देऊन कारखान्याबरोबर केलेल्या ऊस नोंद कराराचा भंग करून ऊस इतर कारखान्यांना देण्याची चूक करू नये असेही जगताप यांनी म्हटले आहे.
कारखान्याने पूर्व हंगामी, सुरू व खोडवा या उसास अनुदानही दिलेले असताना बाहेरील कारखान्यांना ऊस घालून सभासदांनी आपले नुकसान करून घेऊ नये.
सोमेश्वरने गाळप क्षमता वाढवलीसभासदांनी इतर कारखान्यांना ऊस घालून संचालक मंडळास नाईलाजास्तव कारवाई करण्याची वेळ आणू नये. संपूर्ण गाळप वेळेत पूर्ण होत असताना नोंदीचा संपूर्ण ऊस सोमेश्वरलाच देऊन सहकार्य करावे. जेवढे जास्त गाळप तेवढा उत्पादन खर्च कमी व यामुळे सभासदांना जास्तीचा मोबदला देणे शक्य होईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढलेल्या ऊस क्षेत्राचा विचार करता सोमेश्वरने गाळप क्षमता वाढवली आहे.
९३ दिवसांत ८ लाख ६१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप १) सोमेश्वरने ९३ दिवसांमध्ये ८ लाख ६१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.५१ टक्के साखर उतारा राखत ९ लाख ८८ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.२) दैनंदिन साखर गाळप क्षमता ७५०० मेट्रिक टन प्रति दिन असतानाही ९२६२ मेट्रिक टनाच्या उच्चांकी सरासरीने गाळप केले जात आहे.३) को-जन प्रकल्पामधून ६,१४,३४,१३५ युनिटसची वीजनिर्मिती केली असून ३,५७,५९,८९२ युनिटसची वीजविक्री केलेली आहे.४) त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ४२,६०,४०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २३,१७,७२० लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतलेले आहे.
अधिक वाचा: राज्यात खतांचा आणि कीटकनाशकांचा होतोय बेसुमार वापर; काय म्हणतोय माती आरोग्याचा रिपोर्ट?