जालना : पारंपरिक शेतीतील कष्टाची दिशा बदलून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर आणि कृषी विभाग, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे-दाभाडी (ता. बदनापूर) येथे शुक्रवारी (५ डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या विशेष कापूस प्रकल्पातील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपात ते बोलत होते.
जागतिक मृदा दिनानिमित्त माती संवर्धनाचे आवाहन
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे औचित्य साधत, जागतिक मृदा दिन पाळण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी गोपालदास गुजर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मृदेचे संगोपन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. मातीची सुपीकता टिकून राहिली तरच शेती टिकाऊ व फायदेशीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. आर. एल. कदम, न्यूजीउडू सिड कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. बापू पाटील अंधारे, तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. गोपालदास गुजर यांची उपस्थिती होती.
विशेष कापूस प्रकल्पाचा विस्तार
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३-२४ पासून बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद आणि अंबड तालुक्यांत विशेष कापूस प्रकल्प राबविला जात आहे.
कापूस हंगाम २०२५ मध्ये एकूण १३६ हेक्टर क्षेत्रात २१७ शेतकरी यांनी सघन (Closer Spacing) आणि अतिघन (High Density) पद्धतीने कापूस लागवड केली आहे.
'त्री-सूत्री' तंत्रज्ञानाचा सविस्तर उलगडा
मुख्य मार्गदर्शक व उप-प्रकल्प अन्वेषक डॉ. आर. एल. कदम यांनी शेतकऱ्यांना सघन, अतिघन आणि दादा लाड तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण तीन सूत्रांची सविस्तर माहिती दिली.
सूत्र १ — लागवडीचे अंतर
जमिनीच्या गुणधर्मानुसार ३ x १ फूट किंवा ३ x ०.५ फूट अंतर ठेवून लागवड.
सूत्र २ — गळफांदीचे नियोजन
फळफांदी व गळफांदीची योग्य ओळख
लागवडीनंतर ४०–५० दिवसात गळफांदी काढणे
सूत्र ३ — शेंडा खुडणे
पिकाची उंची ३ फूट झाल्यावर
लागवडीनंतर ७०–७५ दिवसात शेंडा खुडणे
याशिवाय, अधिक उत्पादनासाठी ३० मायक्रॉन पॉलिमल्चचा वापर फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
योग्य वाण निवडीवर भर
बापू पाटील अंधारे यांनी 'एक गाव एक वाण' या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना योग्य बियाणे निवडीचा कापूस उत्पादनावर होणारा सकारात्मक परिणाम सांगितला.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमती शिवपणोर (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी केले. उप-कृषी अधिकारी श्री. गोपाल झुंजारे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रगतिशील शेतकरी अनिल टेकाळे, शिवाजी बकाल, मुकुंदराव जैवाल, गिरिज टेकाळे, केदार टेकाळे आणि कल्याण बकाल यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
