Join us

Sweet Orange : मोसंबी उत्पादक फळगळ अन् कोळी रोगाच्या कचाट्यात; असे करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:18 IST

Sweet Orange : बदलत्या हवामानामुळे मोसंबी बागा फळगळ अन् कोळी रोगाच्या कचाट्यात सापडल्या आहेत त्यावर काेणत्या उपाय योजना करायच्या ते वाचा सविस्तर

संतोष सारडा

बदनापूर : तालुक्यातील मोसंबीच्या  (Sweet Orange) फळबागेतील अनेक झाडांवरील फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.दुसरीकडे मोसंबीवर कोळी रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे.

फळगळ आणि रोगाचा प्रादुर्भावाच्या कचाट्यात सापडलेल्या बागायतदार शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नैराश्य पसरत आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा कमी असल्याने पाणी पातळी खोलवर गेलेली आहे. तरीदेखील अनेक शेतकऱ्यांनी विहिरी व शेततळ्यावर खर्च करून मोसंबीच्या फळबागांची जपणूक केली.

तालुक्यात सुमारे ९ ते १० हजार हेक्टर मोसंबी फळबाग क्षेत्र आहे. तसेच या मोसंबीच्या फळबागेसाठी आवश्यक असलेले शेणखत व रासायनिक खत, शेतकऱ्यांना मोसंबीच्या फळबागेतील अंतर मशागत, झाडांची छाटणी व टाचणी करणे, खत, पाणी याबाबत नियोजन करणे अशा विविध कामांसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना मोसंबीच्या फळबागेसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

निसर्गामध्ये अचानक होत असलेल्या बदलामुळे मोसंबीच्या झाडावर रोगाची लागण होऊन फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी यामुळे शेतकऱ्यांना मोसंबीच्या उत्पादनात मोठी घट येत असून, यावर शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. बाजारभाव कमी व खर्च जास्त अशी अवस्था होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

मोसंबी संशोधन, कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांची निराशा

• मोसंबीचे माहेरघर असलेल्या बदनापूर तालुक्यातील मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मोसंबी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

• राज्य शासनाचा कृषी विभागही कार्यरत आहे. या यंत्रणांकडून मंगू / कोळी या मोसंबीवरील विविध रोगांकरिता मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रत्येक महिन्याला प्रशिक्षण मेळावा घेऊन शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाची खरी गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

एक बहार असताना दुसरा बहार नकोच

• किडीच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी शेतकऱ्यांनी एका बहाराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहारासाठी बागा ताणावर सोडू नये. झाडांवर पाण्याचा ताण पडणार नाही. ठिबक संचाने प्रत्येक फळधारणेतील झाडास पाणी मिळते किवा नाही हे वारंवार तपासून पाहावे.

प्रशिक्षणाचे आयोजन करणे आमचे काम नाही. आम्ही अशा मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी जात असतो. काही ठिकाणी मोसंबी, संत्रा या झाडांवर मृग बहराची फळे असतानादेखील आंबिया बहरासाठी बागा पानावर सोडलेल्या आहेत. बागांचा पाणीपुरवठा बंद आहे. पाण्याच्या ताणामुळे मोसंबी पट्टयात अष्टपद वर्गातील कोळी या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. - डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर.

कसे करायचे व्यवस्थापन ?

व्यवस्थापन करण्यापूर्वी जमिनीवर पडलेली फळे ही लागलीच नष्ट करावीत. जेणे करुन इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. फळमाशी ही झाडाखाली जमिनीत कोषावस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची नांगरण करुन कोष नष्ट करावे लागणार आहेत. या करिता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी लागणीर आहे.

विद्यापीठाने दिला उपाय

* मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

* संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.हे ही वाचा सविस्तर : Mosambi Bahar : मोसंबी उत्पादकांनी बागेची काळजी घ्या- पाटील यांचे आवाहन

टॅग्स :शेती क्षेत्रफळेपीक व्यवस्थापनपीकशेतकरीशेती