Join us

पानांपासून ते खोडापर्यंत गुणकारी गुणधर्म असलेल्या 'सुरीनाम चेरी'ची कोल्हापुरात झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:41 IST

Surinam Cherry : शहरातील विचारे माळ येथे राहणारे वनस्पती प्रेमी मोहन माने यांनी आपल्या घराच्या सभोवताली आणि टेरेसवर अनेक वनस्पतींची आणि नावीन्यपूर्ण लहान वृक्षांची लागवड केली आहे.

कोल्हापूर शहरातील विचारे माळ येथे राहणारे वनस्पती प्रेमी मोहन माने यांनी आपल्या घराच्या सभोवताली आणि टेरेसवर अनेक वनस्पतींची आणि नावीन्यपूर्ण लहान वृक्षांची लागवड केली आहे. वनस्पती तज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मोहन माने यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या बागेत 'सुरीनाम चेरी'चा लहान वृक्ष आढळला.

सुरीनाम चेरी वृक्षाची शास्त्रीय नोंद कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भ ग्रंथात आढळत नाही. कोल्हापूर शहर परिसरातून आणि जिल्ह्यातून या वृक्षाची प्रथमच नोंद डॉ. बाचूळकर करीत आहेत. राज्यातून या वृक्षाची नोंद पुणे शहरातून यापूर्वी झालेली आहे. डॉ. बाचूळकर यांनी हा वृक्ष पूर्वी बंगळूरू शहरातील बागेत येथील रोपवाटिकेतून रोप आणल्याचे माने यांनी सांगितले.

सुरीनाम चेरी वृक्षाचे शास्त्रीय नाव 'युजेनिया युनिफल्योरा' असे आहे. हा वृक्ष जांभुळ, पेरुच्या कुळातील आहे. या वृक्षास 'सुरीनाम चेरी' आणि 'ब्राझील चेरी' अशी इंग्रजी नावे आहेत. हा विदेशी वृक्ष आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा राज्यांत या वृक्षांची लागवड दिसून येते.

सुरीनाम चेरीचा वृक्ष ५ ते ८ मीटर उंच वाढतो. खोडाला जखम केली असता त्यातून सुगंधी रेझिनयुक्त द्रव येतो. पाने चुरगळल्यास सुगंधी वास येतो. फळे गोलाकार १.५ ते २.५ सेमी व्यासांची, त्यावर सहा ते आठ वरंबे असतात. फळे पिवळसर नारिंगी किंवा गडद किरमिजी, लालसर रंगांची, आकर्षक, गोड-आंबट चवीची फळे खातात.

सुरीनाम चेरीच्या फळांपासून जाम, जेली, सरबत बनवितात. फळांत व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण जास्त असते. पानांपासून चहा करतात. पानांपासून काढलेले तेल उच्च रक्तदाब आणि वेदना कमी करण्यासाठी वापरतात. तेलामध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. - डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ.

हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार

टॅग्स :शेती क्षेत्रकोल्हापूरफळेभाज्या