फकीरा देशमुख :
भोकरदन तालुक्यात सध्या उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले असून, उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता बळीराजाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. (Summer Jowar Crops)
यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे ज्वारीचे पीक हिरवेगार असून, त्यात आता दाणे भरायला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी मका, सोयाबीनच्या शेतात पेरणी केलेल्या ज्वारीचे पीक काढणीला आले असून, शेतकरी सुखावला आहे. (Summer Jowar Crops)
यंदा रब्बी हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. आता हे पीकही जोमात आले असून, काही ठिकाणी सोंगणीला आले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. (Summer Jowar Crops)
उन्हाळ्यात शाळू ज्वारी पेरणीवर भर
यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनीदेखील रब्बी हंगामात शाळू ज्वारीच्या पेरणीवर मोठा भर दिला होता. त्यामुळे भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाळू ज्वारी आणि उन्हाळी ज्वारीची पेरणी करण्यात आली. आता ही पिके हुरड्यात आली आहे.
रात्र जागलीवर
काही भागांत या उन्हाळी ज्वारीच्या शेतात जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी, काही शेतकऱ्यांना रात्री जागलीवर जावे लागत आहे.
पावसाळी हायब्रीड, बाजरीकडे होतेय दुर्लक्ष
* सध्या अनेक ठिकाणी पीक फुलोऱ्यात, हुरड्यात, तर काही ठिकाणी परिपक्व होऊन सोंगणीला आले आहे. तर काही ठिकाणी उन्हाळी बाजरी आणि ज्वारी फुलोऱ्यात आहे.
* शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पेरलेल्या ज्वारी, बाजरीचे वैरण चांगल्या दर्जाचे नसते. त्याला जनावरेही खात नाहीत. मात्र, उन्हाळी ज्वारी आणि बाजरीचे वैरण चांगल्या प्रतीचे असते.
* पावसाळी ज्वारी, बाजरी खाण्यासाठी चांगली नसते. कारण पावसाळ्यात ज्वारी, बाजरीची कणसे भिजल्यास त्याच्या भाकरीचा उग्र वास येत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.