कोल्हापूर देशभरात सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. बारमाही नद्यांना असणारे पाणी, सुपीक जमीन, योग्य ऋतूमान यामुळे येथील शेती बहरली; परंतु तुलनेने कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला.
गगनबावड्यातपण ऊस अन् चंदगडच्या कोपऱ्यातही ऊस... यामुळेच जमीनदार शेतकरीसुद्धा ओजळभर पिकाला महाग झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. याच्यापुढे जाऊन ग्रामीण भागातसुद्धा ४० टक्के लोकांनी जनावरे पाळणे बंद केल्याने दुधासाठी किटली घेऊन डेअरीच्या दारात थांबावे लागते, हे वास्तव कोल्हापूरच्या श्रीमंतीवर प्रश्चचिन्ह करणारे आहे.
कधी काळी जिल्ह्यात पिकणारा जोंधळा आजच्या पिढीला कशासंगे खातात हेसुद्धा माहीत नाही. तांबडे भात, देशी भुईमूग, नाचणी, हुलगा, साधी तूर, देशी वरणा, राजगिरा, सूर्यपूल, अंबाड्याची भाजी, मोहरी अशी कितीतरी पिके आज जिल्ह्यातून नामशेष झाली आहेत.
आजरा, राधानगरी व शाहूवाडीचा पट्टा चांगल्या भातासाठी प्रसिद्ध होता. आज तेथे उसाच्या फोडाने भाताचा हिरवाई नामशेष केला आहे. चंदगडचा काजू देशात लोकप्रिय होता तेथेही उसाचे मळे फुलले. शिरोळचे शिवार भाजीपाल्याचे आगार म्हणून ओळखले जात होते; परंतु तेथेही २६५ ऊस इतका वाढलाय की, भाजीपाला शेती शोधून सापडत नाही. आजन्याचा कारखाना संपला की घाट रस्ता सुरु होतो त्याठिकाणी साखर कारखाना काढून शेतकऱ्यांचे कोणते हित साध्य झाले हे कोडे काही उलगडत नाही.
चवदार भात, कसदार कार जोंधळा, वासाने कोणती आमटी आहे ओळखू येणारा देशी वरणा, तांबड्या पांढऱ्या पेशी वाढवणारी अंबाड्याची व लाल भाजी अशा कितीतरी चवी आज काळाच्या ओघात कायमच्या हद्दपार झाल्या. याला येथील शेतकरी जितका जबाबदार आहे तितकीच शासनाची धोरणेही जबाबदार आहेत. चंदगडला काजू प्रक्रिया उद्योग, शाहूवाडीला राईस मिल, शिरोळला भाजीपाला साठवण केंद्र उभारण्यास प्रोत्साहन दिले असते तर ही स्थिती ओढवली नसती.
खरीप क्षेत्र | २ लाख ९२ हजार हेक्टर |
ऊस | २ लाख हेक्टर |
भात | ९३ हजार हेक्टर क्षेत्र |
सोयाबीन | ४२ हजार हेक्टर |
भुईमुग | ३८ हजार हेक्टर |
रब्बी क्षेत्र | २१ हजार हेक्टर |
शाळू | ११ हजार २०० हेक्टर |
ज्वारी | ८ हजार ८०० हेक्टर |
उन्हाळी क्षेत्र | ४ हजार ५०० हेक्टर |
हरभरा | ४ हजार ५०० हेक्टर |
इतर कडधान्य | ३ हजार ५०० हेक्टर |
गहू | १ हजार ६५० हेक्टर |
४,३६,००० - हेक्टर जिल्ह्याचे पेरणीलायक क्षेत्र ५,५० - हेक्टर तूर ८,०० - हेक्टर मूग ९,०० - हेक्टर उडीद
जमिनीचा पोत बिघडला
● सातत्याने उसाचे पीक घेतल्याने जमीन क्षारपड होण्याचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिरोळ तालुक्यात तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे.
● पीक फेरपालट नाही, रासायनिक खतांचा अतिरिक्त मारा, गेल्या वीस वर्षांत खताची मोकळी गाडी रानातून न जाणे यामुळेच ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.
● या प्रश्नाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढच्या पिढीसाठी शेती कसदार शेती शिल्लकच राहणार नाही.
दहा एकराचा मालकही पिशवी घेऊन बाजारात
शिरोळ, हातकणंगले, कागल या तालुक्यात १० ते २० एकराचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु केवळ ऊस अन् उसाचं पीक घेतल्याने साधी लाल भाजी सुद्धा या शेतकऱ्यांच्या शेतात पिकत नाही. कुटुंबाला लागणारा भाजीपालाही जर शेतकरी आपल्या शेतात पिकवू शकत नसेल तर कृषिप्रधान देशाचे काय होणार, याचीच चिंता सतावते.
२१ दिवसांत मेथी, पोकळा येतोच कसा
कुठल्याही आठवडी बाजारात गेल्यावर लक्ष वेधून घेणारी मेथी, पोकळा, कोथिबीर लगेच विकत घ्यावी वाटते: परंतु रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे ही पिके जास्त आकर्षक दिसतात, २१ दिवसांत भाजी काढणीला येणार असेल तर त्यातून खाणाऱ्याला सत्त्व मिळेल का याचा विचार पिकवणाऱ्यानेही करण्याची गरज आहे.
वैरणही नको, जनावरेही नको
ग्रामीण भागात पूर्वी घरटी दोन ते तीन जनावरे होती. दूध दुभते वर्षभर घरचेच असायचे. त्यामुळे ताक, दही, तूप प्रत्येकाच्या घरात शिल्लक असायचे आता मात्र ग्रामीण भागात ४० टक्के शेतकऱ्यांनी जनावरे पाळणेच बंद केल्याने शहरासारखेच दुधाचे ग्राहक डेअरीसमोर वाढले असल्याचे दिसून येत आहे.
शरद यादवउपसंपादक, कोल्हापूर.