Join us

Sugarcane Harvesting : ऊस तोड खुशालीसाठी पैसे देणार नाही; मग तुमच्या उसाला तोड येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:27 IST

यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूर: यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे समोर आले आहे.

अतिरिक्त पावसाने उसाचे वजन घटले आहे. उत्पादनखर्च वाढलाच आहे. त्यावर 'खुशाली'च्या माध्यमातून होणारी लूट शेतकऱ्यांना नागवणारी ठरत आहे.

'खुशालीविरोधात तक्रार या,' असे साखर सहसंचालक सांगत असताना शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने एकाही प्रकरणी कारवाईचा बडगा न उगारता 'नरो वा कुर्जरो वा' भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम खुशालीविरोधी पत्रक काढणाऱ्या या कारखान्याचे शेतकरी प्रेम कागदोपत्रीच आहे का, असा सवाल केला जात आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला चिंबवायचेच, असेच धोरण सर्वच यंत्रणेचे असल्याचे दिसून येते.

तोडकरी, ट्रॅक्टरवाले, चिटबॉय यांनी लुटून खाण्याचे ठरवले आहेच, आता कारखानेही शेतकऱ्यांना न्याय देणार नसतील तर कुणाच्या तोंडाकडे बघायचे, हा खरा प्रश्न आहे.

पंचगंगा कारखान्याने गत आठवड्यात शेतकऱ्यांचे साडेबारा हजार रूपये परत करून चांगला पायंडा पाडला परंतु सा. रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या 'दत्त शिरोळ'ला मात्र याचे काहीच वाटत नाही.

आंदोलन अंकुश या संघटनेने मागणी करूनही जर पैसे परत दिले जात नसतील तर याला लोकशाही म्हणायची का, हाच खरा प्रश्न आहे.

साखर सहसंचालकांनी काढली नोटीस दत्त कारखाना खुशालीवर कारवाई करत नसल्याची तक्रार आंदोलन अंकुश संघटनेने केली होती. त्याची दखल घेत साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोटीस काढत त्वरित शेतकऱ्यांचे पैसे तोडणी-वाहतूकदारांच्या बिलातून कापून परत देण्यास बजावले आहे, तरीही प्रशासन हालचाल करत नसेल तर शेतकरी हित भाषणात सांगण्यासाठीच आहे का, अशी विचारणा होत आहे. 

खुशालीसाठी तीन टन कांड्या ठेवल्या शेडशाळ येथील निवृत्त शिक्षक सुरेंद्र निटवे यांच्याकडून मशीन मालकाने इंट्री म्हणून ३५०० रुपये घेतले. ६ लोकांचे दोनवेळा जेवण दिले. पुन्हा ५०० रुपयांसाठी भांडण काढून तीन टन कांड्या शेतात ठेवून मशीनवाला निघून गेला. यात पंचगंगा कारखान्याचे स्लिपर्यायही सामील आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

आम्ही खुशाली देणार नाही असे सांगितल्याने पंचगंगा कारखान्याने गेले एक महिना तोड दिलेली नाही. शेजारचा ऊस तोडताना दोन सऱ्या ऊस कांडलून टाकला आहे. तो आता वाळत आहे. शेती अधिकारी कळून न कळल्यासारखे करत आहेत. माझा आडसाली ऊस अजून तोडत नसतील तर यंत्रणेला काय केले पाहिजे याचे उत्तर साखर सहसंचालकांनी द्यावे. - शिवाजी काळे, टाकवडे, ता. शिरोळ

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीकाढणीकोल्हापूरशेतीपीक