Join us

Sugarcane Harvesting : ऊस तोड यंत्रणेचा 'कर्नाटकी' ठेंगा; अपुऱ्या मनुष्यबळाचा वाजतोय भोंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:18 IST

Sugarcane Harvesting : साखर कारखानदारीसमोर यंदा तोडयंत्रणेचा भाग असलेल्या 'मॅन पॉवर'चा प्रश्न उभा ठाकला आहे. हंगामाचा श्रीगणेशा होण्यास लागलेल्या विलंबामुळे ऊसतोड कामगारांच्या टोळ्यांनी 'कर्नाटकी' सफर पसंद केल्यानेच ही स्थिती ओढवली असल्याचे सूत्रांकडून समजते.

बालाजी आडसूळ 

खाजगी साखर कारखानदारीत राज्यपातळीवर आपला ठसा उमटवलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील साखर कारखानदारीसमोर यंदा तोडयंत्रणेचा भाग असलेल्या 'मॅन पॉवर'चा प्रश्न उभा ठाकला आहे. हंगामाचा श्रीगणेशा होण्यास लागलेल्या विलंबामुळे ऊसतोड कामगारांच्या टोळ्यांनी 'कर्नाटकी' सफर पसंद केल्यानेच ही स्थिती ओढवली असल्याचे सूत्रांकडून समजते.

कळंब तालुक्यात मागच्या दोन दशकांत ऊस गाळप करणाऱ्या उद्योगांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. एकाच तालुक्यात तीन खासगी साखर व चार गूळ पावडर निर्मिती करणारे कारखाने उभे राहिले आहेत.

यात हावरगाव येथे डीडीएन एसएफए युनिट दोन, रांजणी येथे नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, चोराखळी येथे धाराशिव शुगर हे तीन खासगी साखर कारखाने तर मोहा येथे मोहेकर अॅग्रो, वाठवडा शिवारात डीडीएन वन, खामसवाडी येथे सिद्धीविनायक अॅग्रीटेक हे गूळ पावडर कारखाने कार्यान्वित झाल्यानंतर गाळप करत आले आहेत.

या कारखान्याचे हंगामपूर्व नियोजन तगडे असते. ऊसतोड करणारी यंत्रणा, वाहतूक करणारी वाहने याचे 'अॅडव्हान्स' देऊन नोंदणी केली जाते. त्यानंतर कारखान्याचे 'बॉयलर' पेटते, परत गव्हाणीत उसाची मोळी टाकून प्रत्यक्षात गाळपाचा श्रीगणेशा केला जातो. यंदा मात्र अशी सगळी तयारी केलेली असताना तोड यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर मनुष्यबळाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

'नो-केन'चे संकट, कारखानदार हवालदिल

• लोकमतने तालुक्यात यंदाच्या गाळप हंगामात सुरु असलेल्या एका कारखान्याची माहिती जाणून घेतली. हा कारखाना दरवर्षी १०० मोठी वाहने, १०० मिनी ट्रॅक्टर व १०० बैलगाडी असे गाळपाचे नियोजन करत असतो.

• यंदा मात्र यातील निमीच यंत्रणा उपलब्ध झाली आहे. यामुळे कारखाना सध्या 'नो केन' चालत आहे. अशीच इतर काही कारखान्यांची अवस्था आहे. व्यवस्थापन खर्च, घसारा, गाळप खर्च तोच मात्र गाळप कमी असे झाल्यास कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान होते, असे त्या कारखान्याच्या सुत्रांनी सांगितले,

टोळ्या पसार, कर्नाटक गाठले...

• धाराशिव जिल्ह्यातील यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपूर्वी सुरू होणे गरजेचं होते. मात्र, यास काही कारणाने काहीअंशी विलंब लागला.

• यास्थितीत तालुक्यातील साखर उद्योगांच्या उंबरठ्यावर दाखल होणारे तोडयंत्रणेतील मनुष्यबळांने वाहतूक करणाऱ्या वाहनांसह कर्नाटक गाठले.

• यामुळे आजच्या स्थितीत तालुक्यातील सर्वच ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांना अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे. याचा गाळप हंगामावर परिणाम होत आहे.

नॅचरल, धाराशिव फडात...

• यंदाच्या गाळप हंगामात दिनांक १५ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केलेल्या रांजणी येथील नॅचरल शुगरचे ३० डिसेंबरअखेर सर्वाधिक २ लाख ३३ हजार मेट्रीक टन गाळप झाले होते. येथे २ लाख १ हजार क्चिटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

• चोराखळी येथील धाराशिव शुगरने ४ डिसेंबर रोजी गाळप सुरू केले, येथे आजवर ४८ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप होवून ३४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात हावरगाव येथील डीडीएन मात्र बंद अवस्थेत आहे, हे विशेष,

नव्या वर्षात 'हातलाई'ची एन्ट्री...

धाराशिव येथील सुधीर पाटील यांनी ऊस गाळप उद्योगात आपल्या 'हातलाई' उद्योग समूहाचे पाऊल टाकले आहे. तालुक्यातील जवळा खुर्द शिवरात २ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या कारखान्याची उभारणी केली आहे. गत हंगामात याचा चाचणी हंगाम झाला होता. नुकताच त्यांनी याचा प्रथम गाळप हंगाम सुरू केला आहे. कळंबच्या साखर व गूळ उद्योग कारखानदारीत आता 'हातलाई'चा प्रवेश झाला आहे.

हेही वाचा : जायकवाडीसाठी दुष्काळाचा अंदाज घेऊन पाणी सोडणार; वाचा मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला 'हा' निर्णय

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेती क्षेत्रशेतकरीधाराशिवमराठवाडाकर्नाटक