Join us

Sugarcane FRP : यंदा उसाचा तुटवडा; ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांत वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:39 IST

यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना पूर्ण होत आहे, परंतु यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे.

संदीप लोणकरश्रीपूर : यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना पूर्ण होत आहे, परंतु यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे.

फेब्रुवारी मध्य मध्ये म्हणजे येत्या दीड महिन्यातच गाळप हंगाम संपणार आहे. गाळप हंगाम यशस्वीपणे चालावा म्हणून ऊस मिळण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश साखर कारखानदारांनी सुरुवातीला पहिला हफ्ता टनाला २७०० ऊसदर जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांनी २८०० केला. आता २८५० पर्यंत दर गेला आहे.

गाळपासाठी उसाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस घालावा, यासाठी साखर कारखानदारांकडून जादा ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे.

चालू हंगाम चालविण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल. उसाची कमतरता आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होईल.

जो कारखाना उसाला जादा भाव देईल ऊस उत्पादक शेतकरी अशा कारखान्याला ऊस देतील. यामुळे साखर कारखान्यांना ऊस भावाची स्पर्धा करावी लागणार आहे. गेल्या वर्षी अनेक कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना भाव देण्यास टाळाटाळ केली होती.

यंदा मात्र गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध असल्याने कारखान्यांमध्ये दर देण्यावरून स्पर्धा लागली आहे. साखर कारखानदार स्पर्धा निर्माण करत असताना शेवटच्या दिवसापर्यंत उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत हे कारखानदाराने बघणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात ३० टक्के ऊस कमी झालाएकीकडे कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता वाढली तर दुसरीकडे ऊस उत्पादन घटले. पावसाच्या कमी जास्त परिणामामुळे ऊस लागणी कमी झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात २५ ते ३० टक्के ऊस कमी झाला. त्यामुळे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवा, यासाठी जास्तीचा ऊसदर देऊन ऊस मिळवण्यासाठीही कारखानदारांची स्पर्धा लागली आहे. कमी उसामुळे फेब्रुवारी मध्यपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता आहे.

सध्या ऊसदराची स्पर्धा चालू आहे. ही स्पर्धा ऊस कमी असल्यामुळे निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास २१५ लाख मे. टन ऊस उपलब्ध असतो. यावर्षी फार कमी ऊस असल्यामुळे सर्वच कारखानदार ऊस गाळपास कसा येईल यासाठी दराची स्पर्धा निर्माण केली आहे. त्यात साखरेचे दर व मागणी कमी झाली आहे. त्यात एमएसपी वाढलेले नाही. येणाऱ्या काळामध्ये उसाचे दर देताना सुद्धा कारखान्यांना अडचणीचे ठरणार आहे. - डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरशेतकरीपीक