Join us

Sugarcane Crushing पावसाने गाळपाचा अंदाज चुकवला तरी यंदाचा गळीत हंगाम ठरला देशात भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:56 AM

मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला.

नारायण चव्हाणसोलापूर: मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. सरासरी साखर उताऱ्यातही महाराष्ट्र अव्वलस्थानी राहिला.

गतवर्षीच्या हंगामात तुटक तुटक पाऊस पडत राहिला. त्यामुळे उसाची वाढ नीट होऊ शकली नाही. राज्याच्या बऱ्याच भागात कमी पावसाचा ऊस उत्पादनावर परिणाम झाल्याचा साखर कारखान्यांचा अंदाज होता.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किमान १५ ते २० टक्क्यांनी गाळप कमी होईल, असा अंदाज सरकारी यंत्रणांनी ही वर्तवला होता. त्या दृष्टीने साखर कारखान्यांनी नियोजन केले. मात्र, सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला. यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ११० लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

५८८ लाख टन गाळप होईल आणि ९० लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा यंत्रणांचा अंदाज चुकीचा ठरला. हंगामात पावसाने हुलकावणी दिली असली तरी थांबून थांबून झालेला पाऊस उसासाठी पोषक ठरला. योग्य वेळी कमी अधिक पाऊस आणि पुरेसे ऊन यामुळे उसाची वाढ उत्तम झाली.

मागील वर्षी सततच्या पावसामुळे प्रति हेक्टरी ऊस उत्पादन तसेच साखर उताराही वाढला. सुरुवातीच्या काळात शंभर दिवस हंगाम चालेल की नाही याची शाश्वती कोणालाच वाटत नव्हती. मात्र, यंदा १३० दिवस हंगाम चालल्याने साखर उद्योग भलताच खुशीत आहे. सोलापूर जिल्ह्यात तर परतीच्या पावसाने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.

इथेनॉल बंदीचा फटकाकेंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली. पावसामुळे गाळप कमी दिवस चालेल आणि साखर उत्पादनावर त्याचा परिणाम होईल या दृष्टीने केंद्र सरकारचे साखर उत्पादनाबाबत नियोजन होते. इथेनॉल उत्पादन वाढले तर साखरेचे उत्पादन कमी होईल ही भीती सरकारला होती. यात केंद्र सरकारचा ही अंदाज चुकीचा ठरला असेच म्हणावे लागेल. इथेनॉल बंदीमुळे साखर कारखान्यांना मोठा फटका बसला. हंगाम संपेपर्यंत साखर कारखानदार केंद्राकडे इथेनॉलसाठी आग्रही होते; पण हंगाम संपल्यानंतर केंद्राने बी हेवीला परवानगी दिली. त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

एफआरपी बदलते मग साखरेचे भाव का नाहीसाखर कारखानदार गेली पाच वर्षे साखरेच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी करीत आहेत. केंद्र सरकारने २०१९ मध्ये साखरेचा खरेदी दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये जाहीर केला. त्यानंतर पाच वर्षांत त्यात फारसा बदल झाला नाही. विशेष म्हणजे २०१९ साली उसाचा एफआरपी दर २७५० प्रति टन होता. त्यात दरवर्षी बदल करण्यात आले. यंदा तो ३२०० पर्यंत जाईल. साखरेच्या खरेदी दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.

हंगाम दृष्टिक्षेपात..■ उसाचे एकूण गाळप : १०७३ लाख टन■ साखरेचे उत्पादन : ११० लाख टन■ सरासरी साखर उतारा : १०.२७ टक्के■ कारखान्यांची संख्या : २०७■ गाळप हंगाम समाप्त दिनांक : १५ मे २०२४■ हंगाम सरासरी दिवस : १३०

अधिक वाचा: Kharif Sowing शेतकऱ्यांनो खरीप पेरणीसाठी बियाण्याची कशी कराल तयारी

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीपाऊसशेतीमहाराष्ट्रकेंद्र सरकारसरकारपीक