युनूस नदाफ
अर्धापूर तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांची पहिली पसंती केळी हे पीक आहे. परंतू काही गावांतील शेतकऱ्यांनी यंदा नवीन प्रयोग म्हणून काबुली चना (Kabuli gram) पिकाची पेरणी केली. शेतकरी नेहमी हंगामाप्रमाणे किंवा शेतीच्या गुणधर्माप्रमाणे पिकांची लागवड (Cultivation) तथा पेरणी करतात.
तालुक्यात केळी, ऊस, हळद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, गहू आणि भाजीपाला व फुलशेती केली जाते. यंदाच्या हंगामात नवीन प्रयोग म्हणून देळूब बु या एकाच गावात काबुली चण्याची पेरणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावात यंदा सर्वाधिक काबुली चण्याची पेरणी झाली आहे.
संपूर्ण तालुक्यात गावरान हरभरा या पिकाची पेरणी करण्यात आली. मात्र, देळूब बु गावात काबुली चन्याची (Kabuli gram) मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. जमिनीची योग्य मशागत करून नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली. पेरणी करताना एकरी ५० किलो बियाणे लागले तसेच वातावरणानुसार ३ ते ४ फवारणी केल्या.
रब्बी हंगामात काबुली
चण्याच्या पेरणीत वाढ झालेली दिसून येत आहे. मागील तीन- चार वर्षापूर्वी २०० ते ४०० एकरांत काबुली चण्याची पेरणी होत होती. मात्र, या वर्षात १२०० एकरांत काबुली चण्याची पेरणी झालेली आहे. सध्या चण्याची काढणी सुरू आहे. चण्याची काढणी करण्यासाठी मजूरदार मिळत नसल्याने दोन हार्वेस्टर चार मळणीयंत्र काम करीत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.
काबुली चण्याची किमया
सध्याला बाजारात काबुली चण्याला मागणी आहे. तसेच परदेशात मागणी वाढत असल्याने काबुली चण्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. सध्या बाजारपेठेत काबुली चण्याच्या कॉलिटी प्रमाणे ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.आजच्या दराप्रमाणे एकरी ६० ते ६५ हजाराचे उत्पन्न मिळत आहे.
११ क्विंटलचा उतारा
यंदा आमच्याकडे ५० एकरांत काबुली चण्याची पेरणी केली असून, काही प्रमाणात काढणीस आले आहे. सरासरी १० ते ११ क्विंटलचा उतारा मिळतो. - नूरखान पठाण, काबुली चना उत्पादक शेतकरी
देळूब गावात अशी झाली पेरणी
देळूब गावचे क्षेत्रफळ | १०५० हेक्टर |
लागवडीचे क्षेत्रफळ | १०८ हेक्टर |
रब्बी पेरणी | ८७१ हेक्टर |
काबुली चणा | १२०० एकर |
ऊस | ५०० एकर |
हळद | ४०० एकर |
गावरान चना | १५० एकर |
गहू | ८० एकर |
हे ही वाचा सविस्तर : Farmer story : हळदीतून भगवानरावांनी केली सोनेरी किमया; मिळाले लाखांचे उत्पन्न