कोल्हापूर : कोल्हापूरकर नागरिकांना गूळ, गुऱ्हाळघरे आणि तिथले गुळवे हे काही नवे नाहीत. शिवाजी विद्यापीठात आलेल्या अभ्यागतांना 'पीएचडीवाला गुळव्या' त्याच्या आधुनिक गुऱ्हाळयंत्रासह पाहावयास मिळाला.
विद्यापीठात 'शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०'च्या निमित्ताने आयोजित विशेष नवसंशोधक आणि स्टार्टअप्स प्रदर्शनामध्ये या गुळव्याला आणि त्याच्या उत्पादनांना मोठीच पसंती लाभली.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
स्वतःला अभिमानाने 'पीएचडीवाला गुळव्या' म्हणवून घेणारे आणि आपल्या बँडचेही नाव तेच ठेवणारे डॉ. ओंकार अपिने आणि विद्यापीठाच्या जैवतंत्रान अधिविभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सुषमा पाटील यांनी अधिविभाग प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुळावर आणि गूळ निर्मिती प्रक्रियेवर गेली अनेक वर्षे काम केले.
त्याद्वारे त्यांनी खऱ्या अर्थाने सेंद्रिय अशा गुळाची, गूळ पावडरची निर्मिती केली. या अंतर्गत उसाचे रसवंतीगृह आणि गुऱ्हाळघर यांच्यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यासंदर्भात डॉ. अपिने यांनी सांगितले की, या प्रकल्पाअंतर्गत पोर्टेबल गुऱ्हाळयंत्राची निर्मिती केली आहे. यामध्ये रसवंतीगृहाप्रमाणे रसही काढता येईल आणि आरोग्यदायी पद्धतीने गूळही तयार करता येईल.