लष्कर (पुणे): पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारमधून गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मुद्रांक वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे कोषागारात मोठ्या प्रमाणत कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक दोन महिन्यांपासून शिक्के न मारता पडून असून, यामुळे शासनाचा मोठा महसूलही बुडत असून इतक्या मोठ्या प्रमाणात शासन मुद्रांक वितरित न करता त्याचा साठा का करीत आहे हे गौडबंगाल समोर उभे राहिले आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयात शासनाच्या कोषागारमध्ये शासनाचे मुद्रांक (स्टॅम्प पेपर) शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या विक्रेत्यांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना ते वितरित केले जातात.
पुणे शहरात जवळपास १११, तर जिल्ह्यात ५०० च्या वर अधिकृत मुद्रांक वितरक आहेत. विविध शासनाच्या करारनामा, खरेदी, विक्री, शासनाच्या विविध दाखले आणि न्यायालयीन कामकाजासाठी मुद्रांकाची गरज असते.
दररोज एकट्या पुणे शहरातून करोडो रुपयांची मुद्रांकांची विक्री केली जाते. त्यातून शासनाला करोडो रुपयांचा महसूल दररोज मिळतो.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुण्याच्या कोषागारातून वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित केले जात नसल्याने अनेक नागरिकांचे यामुळे मोठे हाल होत आहेत. मुद्रांक मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत.
शंभर रुपये मुद्रांक बंदचा फटका वितरण व्यवस्थेला
शासनाने १५ ऑक्टोबर २०२४ ला १०० रुपये मुद्रांक बंद निर्णय काढल्याने सध्या १०० चे पाच स्टॅम्प पेपर घ्यावे लागत आहेत, शासनाकडे उपलब्ध असलेला १०० रुपये मुद्रांक संपवणे हीदेखील जबाबदारी वितरण व्यवस्थेवर आहे. त्यामुळे कादाचीत ५०० चे मुद्रांक साठवणीच्या स्वरूपात जमा केले असतील अशीदेखील चर्चा मुद्रांक वितराकांमध्ये आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेमुळे येथील सामान्य नागरिक मात्र मोठ्या प्रमाणत त्रस्त झाला आहे.
तुटवड्यामुळे मुद्रांकाची चढ्या दरात विक्री
अनेक नागरिकांनी याबाबत तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या की अनेक वितरक हे मुद्रांक तुटवडा असल्याने तीस ते चाळीस रुपये जास्त अनेक ठिकाणी शंभर रुपये जास्त दराने मुद्रांक विकत आहेत, निवडणूक काळात तर एका उमेदवाराने अर्ज भरताना ५०० चे मुद्रांक चक्क हजार रुपयाला विकत घेतले अशी चचदिखील पुणे शहर व जिल्हा परिसरात सुरु आहे.
दोन महिन्यांपासून कोषागारात मुद्रांक धूळ खात
आज शहरात मोठ्या प्रमाणत मुद्रांक तुटवडा असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, तर दुसरीकडे शासकीय कोषागारात करोडो रुपयांचे मुद्रांक धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शासन हे मुद्रांक का साठवत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वितरकांच्या मात्र कोषागार कार्यालयाकडे मनुष्यबळ नसल्याने मुद्रांकावर शिक्का मारला जात नसल्याने ते वितरित होत नाही अशी माहिती त्यांना मुद्रांक विभागाकडून मिळाली आहे.
शासनाचा करोडोंचा महसूल बुडतो आहे
कोषागारात करोडो रुपयांचे मुद्रांक धूळ खात पडून असून, ते वितरकांना न दिल्याने नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेच. मात्र, यामुळे शासनाचा रोजचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतदेखील आहे. अन् नागरिकांनाही फटका बसत आहेत.
असि. रजिस्ट्रार म्हणतात जेडीआरला विचारा
याबद्दल कोषागारचे असिस्टंट रजिस्टर अधिकारी शिवाजी भिसे यांना विचारले असता आम्ही माहिती देऊ शकत नाही, तुम्ही जेडीआरला विचारा असे सांगत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले, वास्तविक दररोज वितरकांना मुद्रांक पुरविण्याचे महत्वाची जबाबदारी शिवाजी भिसे यांची आहे.
१५ ऑक्टोबर राज्य शासनाचा १०० रुपये स्टॅम्प पेपर बंद निर्णय, त्यांनतर निवडणुका आणि इतर तांत्रिक अडचणी यामुळे मुद्रांक तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, याच महिन्यात तीन तारखेला आम्ही मुद्रांक आणले आहे ते सम समाईक पातळीवर वितरण करण्याच्या सूचना मी कोषागार अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठवडाभरात ही समस्या सुटेल. - संतोष हिंगणे, सह जिल्हा निबंधक
दोन महिन्यांपासून मुळात कोषागारातून आम्हाला मुद्रांक अतिशय कमी प्रमाणात वितरित केले जात आल्याने मुद्रांकाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, आठवडाभरात ही समस्या सुटेल असे आम्हाला कोषागार अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. - मनोज प्रक्षाळे, अध्यक्ष, पुणे शहर महाराष्ट्र राज्य मुद्रांक वितरण संघटना