Pune : राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी अडचणी येत असल्याने मुदतवाढीची मागणी होत होती. त्यानुसार पणन मंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठला होता. त्यानंतर सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार आता ६ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
राज्यासाठी १४ लाख १३ हजार २६९ मेट्री टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्ये आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रावर ३० जानेवारी पर्यंत ४ लाख ३७ हजार ४९५ शेतकऱ्यांकडून ९ लाख ४२ हजार ३९७ मेट्रिक टना पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली असल्याची माहिती आहे. ६ फेब्रुवारी पर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन खरेदीचे अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केलेले आहेत. काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहेत. तर शेतकऱ्यांना अजून ६ दिवस सोयाबीन हमीभावाने विक्री करता येणार असल्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.