राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ (Mudatavadha) मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
लातूर जिल्ह्याचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेता लातूर जिल्ह्यासाठी आता २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही आता मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते.
राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे. राज्यात 'नाफेड'(Nafed) आणि 'एनसीसीएफ'च्या (NCCF) माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रावर २५ जानेवारीपर्यंत ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे.
३१ जानेवारीपर्यंत यामध्ये मोठी वाढ होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. लातूर जिल्ह्याने आपले पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून १ लाख २८ हजार ४१७ मेट्रिक टन खरेदी पूर्ण झालेली आहे.
काही शेतकऱ्यांचे (Farmer) सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या मागणीनुसार आता लातूर जिल्ह्यासाठी वाढीव २० हजार मेट्रिक टनासह एकूण ३० हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन १२ जानेवारीपर्यंत होणाऱ्या सोयाबीन खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळविली होती.
आता पुन्हा राज्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता राज्यात ३१ तारखेनंतर ७ दिवस सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती, पणन मंत्री जयकुमार रावल (Marketing Minister Jayakumar Rawal) यांनी दिली आहे.