Pune : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी २०२३ सालच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. यासाठी सरकारने ४ हजार १९३ कोटी रूपये मंजूर केले असून त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, सोयाबीन-कापूस अनुदानासाठी राज्यातील ९६ लाख खातेदार पात्र होते. त्यातील ८० लाख वैयक्तिक खातेदार आणि १६ लाख संयुक्त खातेदार होते. पण अनुदान वाटपासाठी कृषी विभागाने आधार संमतीपत्र अनिवार्य केले होते. पण आत्तापर्यंत ७३ लाख खात्यांचे आधार संमतीपत्र मिळाले आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत ६८ लाख खात्यांची अनुदान वाटपाची प्रक्रिया झाली असून ५१ लाख ४२ हजार खात्यांना अनुदान यशस्वीरित्या वाटप झाले आहे. तर २३ लाख खातेदारांचे आधार संमतीपत्र आले नसून त्यांना अनुदान वाटप झाले नाहीत. आत्तापर्यंत २ हजार ५०८ कोटी रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
कापूस - सोयाबीन (खरीप २०२३) अनुदान अपडेट
- एकूण खाते - ९६ लाख
- संयुक्त खाते १६ लाख
- अनुदान वाटपाची प्रक्रिया - ६८ लाख खाते
- अनुदान यशस्वीरित्या वाटप - ५१ लाख ४२ हजार खाते
- आधार संमती मिळालेली खाते - ७३ लाख
- आधार संमती बाकी असलेली खाते - २३ लाख
- आत्तापर्यंत जमा झालेला निधी - २ हजार ५०८ कोटी