Join us

पणन महासंघाच्या आदेशात 'ज्वारी'चा विसर; शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:39 IST

हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांत रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच 'भरड' कारभाराचा फटका बसला. पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ 'भरडधान्य' असा उल्लेख असून, 'ज्वारी'चा स्पष्ट उल्लेख न आल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली.

नीलेश जोशी 

हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांत रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच 'भरड' कारभाराचा फटका बसला. पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ 'भरडधान्य' असा उल्लेख असून, 'ज्वारी'चा स्पष्ट उल्लेख न आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे २ हजार शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली.

त्यानंतर दि. २३ जुलैला सुधारित आदेश निघाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी लाच प्रकरणात अडकल्यामुळे खरेदीचे आदेश गोदाम किपरांपर्यंत पोहोचलेच नाहीत. परिणामी गोंधळ उडत गेला आणि आता अवघ्या चार दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उर्भ आहे.

जिल्ह्यात ३१,८४९ शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदीसाठी ज्वारीची नोंदणी केली होती; मात्र केंद्र बंद राहणे, गोंधळलेली आदेशप्रक्रिया आणि शब्दांचा अचूक उल्लेख नसणे, या त्रुट्यांमुळे केवळ १२,५०० शेतकऱ्यांचीच खरेदी झाली. उर्वरित १९,३४९ शेतकऱ्यांची ज्वारी अजूनही केंद्रात पडून आहे.

शासनाने जरी २० जुलैपर्यंत खरेदीची मुदत दिली होती, तरी प्रत्यक्षात १ ते ९ जुलैदरम्यान केंद्रे बंद असल्याने केवळ १० दिवस खरेदी झाली. त्यातच सुरुवातीच्या आदेशात 'भरडधान्य' असा संदिग्ध उल्लेख आल्याने 'ज्वारी'वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यानंतर सुधारित आदेश जरी निघाले, तरी पुरवठा अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे ते गोडावूनपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रातून रिकाम्या हाताने परत जावे लागले, तर काहींना ताटकळत बसावे लागले.

अशी आहे स्थिती

३१,८४९ - ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी

१९,३४९ - शेतकऱ्यांची ज्वारी आजही केंद्रांत पडून

१२,५०० - शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी

केंद्रीय राज्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ

शेतकऱ्यांचा वाढता संताप लक्षात घेता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप केला. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा करून तहसीलदारांमार्फत खरेदीसाठी आदेश दिले. मात्र, शनिवार आणि रविवारची सुटी आल्याने यंत्रणा पुन्हा ठप्प झाली. सोमवारपासून खरेदीस गती मिळण्याची शक्यता आहे.

हमीभावच शेवटचा आधार!

शासनाने ज्वारीचा हमीभाव ३,३७१ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र, बाजारात व्यापारी ज्वारी फक्त २,००० ते २,२०० रुपयांत खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांचा आधार घेतला. पण तिथेही गोंधळ व अकार्यक्षमता यामुळे फसवणूकच पदरी आली.

'ज्वारी'चा पेरा घटतोय

यंदा केवळ ८ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. पशुधन घटल्याने ज्वारीचा उपयोग आधीच कमी झाला होता, त्यात शासनाच्या गोंधळलेल्या धोरणामुळे शेतकरी ज्वारीपासून आणखी दुरावत आहेत. करडी, तिळ, जवस यांच्यासारखीच ज्वारीही शेतीतून नामशेष होईल, अशी भीती आता प्रत्यक्षात भासत आहे.

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :बुलडाणाज्वारीबाजारसरकारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीविदर्भ