रब्बी हंगाम २०२५-२६ साठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यात रब्बी ज्वारीची मुदत संपली असून, आता गहू व हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत रब्बी पिकांसाठी पीक विमा काढता येणार आहे.
शासनाकडून रब्बी व खरीप पीक विमा १ रुपयात काढण्याची योजना सुरू केली होती. मात्र, एका वर्षातच ही योजना बंद केली आहे. ही योजना सुरू होती, तेव्हा ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र, ही योजना बंद केल्यानंतर शेतकऱ्यांचाही प्रतिसाद विमा योजनेला मिळताना दिसत नाही.
योजनेचे उद्दिष्ट काय?
• प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, कीटक किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
• राज्यातील पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबवली जात आहे.
नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे कोणती ?
नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रथम ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी लागेल. अर्ज करताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. जसे की, शेतकरी ओळखपत्र, आधारकार्ड, बैंक खात्याचा तपशील, जमिनीचा मालकी हक्काचा पुरावा किंवा भाडेकरार, ई-पीक पाहणी पुरावा शेतकऱ्यांना द्यावा लागणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
पिकांसाठी अंतिम मुदत कोणती?
| पिकाचे नाव | अर्ज करण्याची शेवटची तारीख |
| रब्बी ज्वारी | ३० नोव्हेंबर (मुदत संपली) |
| गहू | १५ डिसेंबर |
| हरभरा | १५ डिसेंबर |
| रब्बी कांदा | १५ डिसेंबर |
| उन्हाळी भात | ३१ मार्च २०२६ |
| उन्हाळी भुईमूग | ३१ मार्च २०२६ |
असे मिळेल पिकांना संरक्षण
| पीक | विमा संरक्षित रक्कम |
| गहू | ३० हजार |
| ज्वारी | २४ हजार |
| हरभरा | २४ हजार |
| भुईमूग | ३५ हजार |
| कांदा | ६० हजार |
