अरुण बारसकरसोलापूर : ज्वारीपेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून, राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५० टक्क्यांपर्यंत पेरा झाला आहे.
ज्वारी पेरणीत सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा असला, तरी गहू व हरभऱ्याने मराठवाड्यातील क्षेत्र अधिक व्यापले आहे. राज्यात रब्बी पेरणी कालावधी जवळपास पूर्ण होत आला आहे.
उशिराने गहू व हरभऱ्याच्या पेरणीने चांगला वेग घेतल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यात यंदा ज्वारी पेरणीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ५३ हजार हेक्टर इतके होईल, असा कृषी खात्याचा अंदाज होता.
त्यादृष्टीने रब्बी पेरणीसाठीचे नियोजन करून त्या-त्या जिल्ह्यांना उद्दिष्ट देण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असली, तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारी पेरणी फारच कमी क्षेत्रावर झाली असली, तरी अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र ज्वारीने व्यापले आहे. राज्यात ज्वारीचे सरासरी १४ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र असले, तरी प्रत्यक्षात १५ लाख लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली आहे.
त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपर्यंत, तर अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रात ७ लाख ४० हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ६ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.
राज्यातील ज्वारी व गहू पेरणीची आकडेवारी (हेक्टर)
जिल्हा | ज्वारी | गहू |
सोलापूर | २,४३,००० | ५०,१६८ |
धाराशिव | १,७०,२८९ | २६,१४२ |
बीड | १,५७,५०३ | ४४,५६४ |
अहिल्यानगर | १,४९,२९३ | १,३३,५८२ |
सातारा | १,३०,१०१ | ४०,२२६ |
सांगली | १,१९,१९३ | १९,२२३ |
परभणी | ९३,७४४ | २७,८८९ |
पुणे | ८७,८१२ | ४२,१३८ |
जालना | ८४,८९० | ५९,४९९ |
गहू पेरणीत छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, तर नागपूर जिल्ह्यात ८९ हजार हेक्टर, बुलढाण्यात ६६ हजार, नाशिक जिल्ह्यात ६१ हजार, जालना जिल्ह्यात ६० हजार, पुणे व जळगावमध्ये प्रत्येकी ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ५० हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ४५ हजार, तर सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला आहे. अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रात दोन लाख ८७ हजार, तर मराठवाड्यात तीन लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी झाला आहे.
गव्हाचे राज्यात सरासरी क्षेत्र १० लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ११ लाख ८० हजार (११२ टक्के), मका दोन लाख ५८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
प्रत्यक्षात ४ लाख ४४ हजार हेक्टर (१७२ टक्के), हरभरा २१ लाख ५२ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असले, तरी प्रत्यक्षात २७ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर (१२७ टक्के) पेरणी झाली आहे. यात आता अंतिम पेरणी काही हेक्टर वाढ होईल, असे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.