छत्रपती संभाजीनगर : माती परीक्षणातून जमिनीची आरोग्य पत्रिकाच (Soil Heath card) शेतकऱ्यांच्या हाती पडते. माती परीक्षणामुळे(Soil Testing) जमिनीचा पोत कळतो, शिवाय गरजेनुसार खतांचा वापर करता येतो, यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक खर्चही कमी होतो.
ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी माती परीक्षण केले. यावर्षी आतापर्यंत ६ हजार ५०० शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्यासाठी कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेकडे धाव घेतली.
माती परीक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून आणि याचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी येतो. याविषयी कृषी विभागाने ग्रामपातळीवर जाऊन जनजागृती केली. याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. शेतकरी शेतातील माती नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणत आहेत.
वर्षभरात ६,४८० नमुने तपासणीला
कृषी विभागाच्या जिल्हा मृद व सर्वेक्षण कार्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळा आहे. येथे शेतकऱ्यांनी १,१४० माती नमुने तपासणीसाठी आणले. कृषी विभागाच्या विविध योजनेंतर्गत ६,४८० माती नमुने तपासणीसाठी आले.
मातीची तपासणी कुठे?
• शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. तेथे माती आणि पाणी परीक्षण होते.
• पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोगशाळेत आणि काही खाजगी प्रयोगशाळेतही माती परीक्षण करण्यात येते.
खासगीत ४ हजार माती नमुने तपासणी
• आपल्या जिल्ह्याला १५ हजार माती नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे.
• कृषी विभागाच्या प्रयोगशाळेची वार्षिक क्षमता ८ हजार माती नमुने तपासणीची आहे. शासनाच्या निर्देशानुसार कृषी विज्ञान केंद्र आणि एमजीएमच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत ८ हजार माती नमुन्यांची तपासणी करण्यात येते.
मृदा कार्डमुळे पीक पद्धतीत बदल शक्य
माती परीक्षण कार्डमुळे पीक पद्धतीत बदल करणे शक्य होते. जमिनीला कोणत्या मूलद्रव्याची आवश्यकता आहे, हे समजते. त्याआधारे अनावश्यक रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चाची बचत होते. शेतकऱ्यांनी दरवर्षी अथवा एक वर्षाआड माती परीक्षण करून घ्यावे. - तेजस्वी साळुंके, जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी
वैयक्तिक शेतकरी मातीपरीक्षण
महिना | प्राप्त नमुने | तपासणी | प्रलंबित नमुने |
जानेवारी | १४४ | १४४ | ० |
फेब्रुवारी | १८१ | १८१ | ० |
मार्च | १२४ | १२४ | ० |
एप्रिल | ३४ | ३४ | ० |
मे | ५९ | ५९ | ० |
जून | ४४ | ४४ | ० |
जुलै | २३८ | २३८ | ० |
ऑगस्ट | ९० | ९० | ० |
सप्टेंबर | १०३ | १०३ | ० |
ऑक्टोबर | ३९ | ३९ | ० |
नोव्हेंबर | २८ | २८ | ० |
डिसेंबर | ५६ | ५६ | ० |
हे ही वाचा सविस्तर : Agro Advisory : बदलत्या हवामानात असे करा पिकांचे नियोजन