Join us

Shet Rasta : शेतकऱ्याच्या बांधावरच न्याय निवडा होणार; आता प्रत्येक शेतात जायला रस्ता मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:19 IST

shet rasta nirnay कोपरगाव तहसीलदार यांच्या 'बांधावरच न्यायनिवाडा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 'कोपरगाव पॅटर्न' म्हणून राज्यात नावारूपाला आला आहे.

अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा केला आहे.

मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २,१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे.

कोपरगावतहसीलदार यांच्या 'बांधावरच न्यायनिवाडा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 'कोपरगाव पॅटर्न' म्हणून राज्यात नावारूपाला आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी 'बांधावरच न्यायनिवाडा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

यात गावनकाशानुसार अतिक्रमित किंवा बंद झालेले शिवाररस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग मोकळे करून वादग्रस्त रस्ते प्रत्यक्ष पाहणीद्वारे खुले करण्यात येत आहेत. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ६० रस्ते खुले करण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा फायदा घेतलेल्या सडे गावातील शेतकरी विजय पाटील, छब्बू बारहाते, सतिष बारहाते, तुळशीराम लोहकणे म्हणाले, गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सतीच्या बांधाचा रस्ता वाद‌ग्रस्त होता.

तहसीलदार महेश सावंत यांनी दोनदा बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वाच्या सहकार्याने रस्ता खुला केला. या निर्णयामुळे शंभरहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आता सर्वांसाठी खुला झाला आहे.

शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावरतालुक्यातील करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, संवत्सर, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, रवंदे, धोर्डेवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जऊर पाटोदा, धारणागाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, उक्कडगाव, मल्हार वाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगांव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, कासली-शिरसगाव रस्ता, कासली-पढेगाव रस्ता, कासली-उंदीरवाडी रस्ता, सडे व मनेगाव या गावातील शिवार रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.

शेतजमिनींचे विभाजन व हस्तांतरणामुळे रस्त्यांवरील वाद वाढले आहेत. प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश असून, तहसीलदार महेश सावंत यांनी ६० प्रकरणे बांधावरच सामोपचाराने निकाली काढली आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचला असून, वाद कायमस्वरूपी मिटल्याने अपील व पुनर्विचार प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. - माणिक आहेर, उपविभागीय अधिकारी, शिर्डी

प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे, असा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा 'बांधावरच न्यायनिवाडा' उपक्रम राबविला. शेतकऱ्यांचे एकमेकांमध्ये असलेले वाद सामंजस्याने मिटल्याने जय-पराजयाची भावना राहिली नाही. यामुळे अपीलांचे प्रमाण ही शून्य झाले. - महेश सावंत, तहसीलदार

अधिक वाचा: लाईट बिलावरील नावातील बदल दुरुस्ती होणार आता ७ दिवसांच्या आत; अर्जांना स्वयंचलित मंजुरी

English
हिंदी सारांश
Web Title : Justice at Farm: Farmers Get Field Access Via Dispute Resolution

Web Summary : Kopargaon's innovative program resolves farm road disputes on-site, benefiting thousands. Sixty cases cleared, opening 45 km of roads. Farmers laud the initiative, ending decades-long disputes and improving access.
टॅग्स :शेतीशेतकरीसरकारराज्य सरकारअहिल्यानगरजिल्हाधिकारीतहसीलदारकोपरगावचंद्रशेखर बावनकुळे