निहाळे : यंदा सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे चारा व पाण्याच्या शोधार्थ सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांचे तांडे दाखल झाले आहेत. मेंढ्यांना खाण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील कांदापात मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असून, मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने एप्रिल महिन्यात मेंढपाळांना चारा व पाणी या दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांदापात खाणाऱ्या मेंढ्यांना अक्षरशः गव्हाच्या शेतातील काड्या, वापरातील झाडांचा पालापाचोळा, माळरानावरील गवताचा काडी कचरा खाऊन दिवस काढावे लागत असून, पावसाळ्यात हिरवा चारा खाणाऱ्या मेंढ्या ऐन उन्हाळ्यात चाऱ्यासाठी फिरताना दिसून येत आहेत.
निहाळे, फत्तेपूर, कचोरी, मानोरी, मन्हळ, सुरेगाव, माळवाडी, खंबाळे परिसरात नुकतीच कांदा काढणीस सुरुवात झाली आहे. शेतात कांदा काढून पडलेली कांदापात मिळवण्यासाठी मेंढपाळ धडपड करीत आहेत. वाढत्या ऊन्हामुळे त्यांची भटकंती वाढली आहे.
चारा उपलब्ध करून देण्याची मागणी
ग्रामीण भागातील मेंढपाळांना शासनाने चारा उपलब्ध करून देण्यात यावा, जनावरांना पिण्यासाठी पाण्याचे हौद परिसरात बांधण्यात यावे, अशी मागणी येथील मेंढपाळ पिंटू शिंदे यांनी केली आहे.
उन्हाती तीव्रता वाढल्याने पाण्याचे स्त्रोत पडले कोरडेठाक; प्रश्न गंभीर
यंदा उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडू लागल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने पशुपालक व मेंढपाळांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिसरातील सर्व जलस्त्रोत कोरडेठाक पडल्याने रानाचनात शेळ्या, मेंढ्यांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. मेंढपाळ आज येथे तर उद्या कोठे असा मजल दरमजल आपला प्रवास गावोगावी फिरून फिरून करत आहेत. शेतात आपले बिऱ्हाड मागून शेजारीच मेंढ्यांचा आखाडा टाकला जात आहे.