Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:29 IST

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

सांगोला : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आरेखनात कोणताही बदल न करता जीएमआरनुसार शक्तिपीठ महामार्गाची बाधित गावातील क्षेत्र मोजणी पूर्ण करण्यास सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर्ण संमती दर्शविली आहे.

मात्र, आरेखनात बदल केल्यास भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आत्मदहनाचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. सांगोला तालुक्यातील बाधित गावातील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

बहुचर्चित नागपूर (पत्रा देवी)-गोवा शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून जाणार असून याबाबतचे मूळ आरेखण यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राजपत्रात जाहीर करून वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले आहे.

या आरेखणानुसार मोनार्क कंपनीमार्फत प्रत्यक्ष शेतजमिनीवर खांब उभारून रस्त्याच्या खुणा निश्चित केल्या आहेत. या प्रक्रियेनुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयामार्फत बाधित शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

मात्र, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील बाधित काही गावांतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास विरोध केल्यामुळे क्षेत्र मोजणी थांबली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना धाराशिवपर्यंत रस्ता मूळ आरेखणानुसार व पुढे उस्मानाबाद, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत काही प्रमाणात आरेखण बदलण्याचे संकेत दिल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोजणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेली असताना बदल झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. प्रशासनाने उर्वरित क्षेत्र मोजणी लवकरात लवकर पूर्ण करून अंतर्गत मूल्यांकन करावे, अशी मागणी केली आहे.

मोजणीची कामे पूर्ण करा..◼️ भूसंपादन अधिकारी व बाधीत शेतकऱ्यांची अद्याप कोणतीही संयुक्त बैठक न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. काही लोक चुकीच्या बातम्या पसरवून शक्त्तीपीठाला विरोध असल्याचे भासत आहेत.◼️ त्यामुळे जुलै २०२५ पासून सुरू असलेल्या क्षेत्र मोजणीची कामे अफवांना बळी न पडता तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी मोनार्क कंपनी, उपअधीक्षक मोजणी अधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अधिक वाचा: 7/12 Download: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers threaten self-immolation if Shaktipeeth Highway alignment changes.

Web Summary : Sangola farmers consent to the Shaktipeeth Highway project, demanding adherence to the original alignment. Any deviation will lead to self-immolation at land acquisition offices, they warn, fearing losses from altered plans after significant survey completion.
टॅग्स :शेतकरीशेतीसोलापूरमहामार्गशक्तिपीठ महामार्गजिल्हाधिकारीराज्य सरकारसरकारदेवेंद्र फडणवीस