Join us
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका; चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:13 IST

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर चरका व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्याच्या हरताळा (ता. मुक्ताईनगर) परिसरात दरवर्षी शेकडो हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. मात्र, यंदा थंडीचा कडाका वाढल्याने केळी पिकावर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

चरका रोगामुळे केळीच्या बागांची वाढ खुंटत असून, याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, या रोगामुळे फळांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरापासून तापमान सातत्याने कमी होत असून, कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात लाभ होत असला, तरी केळीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

केळीच्या कांदेबागांवर अति थंडीमुळे चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने वाढ खुंटली असून, गुणवत्तेत घट होत आहे. तसेच, मृग बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेकडो हेक्टरवरील केळीचे पीक धोक्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

चरकामुळे ढासळते खोडाची अन्नप्रक्रिया

• केळीच्या खोडाकडून मुळांमार्फत जमिनीतील अन्नघटक शोषले जातात व त्यामुळे पिकाची वाढ होते. मात्र, अति थंडीमुळे ही अन्नप्रक्रिया ढासळली आहे. अशा परिस्थितीत खोडाला पानांमार्फत अन्न मिळण्याचा प्रयत्न होतो.

• परंतु, चरका रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांद्वारे आवश्यक घटक खोडाला उपलब्ध होत नसल्याने केळीची पाने पिवळसर पडत असल्याचे चित्र आहे.

• दरम्यान, कृषी विभागाने तातडीने पाहणी करून चरका व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सध्या थंडीमुळे केळीवर करपा व सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने या रोगांचा केळी फळ पीक विमा सन २०२६-२७ च्या नवीन परिपत्रकात समावेश करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. याबाबत - प्रदीप काळे, शेतकरी, हरताळा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव.

केळीवर करपाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे येणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. माल काढण्यास अडचणी येत आहेत. मदतीची गरज आहे. - सोपान दांडगे, शेतकरी, हरताळा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतकरीशेतीफलोत्पादनपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणबाजारजळगाव