शीतलकुमार कांबळे
अंगणात, बागेत किंवा इमारतीवर अनेकदा मधमाशांचे पोळ लागते. त्यापासून मध काढण्यासाठी अनेकदा पोळं जाळण्यात येतं. काही वेळा पोळ्याला दगड मारला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, सोबत दंडही आकारला जातो.
शहरीकरण वाढत असताना झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांच्या संख्येवर परिणाम होते. सोलापुरात सूर्यफूल व डाळिंबाचे उत्पादन जास्त होत असल्याने या पिकांकडे मधमाशा आकर्षित होतात.
त्यामुळे ते जवळपास पोळ तयार करून राहतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात.
इमारतीच्या उंच ठिकाणी लागलेले मधमाश्यांचे पोळे पाहिल्यानंतर त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. पेस्ट कंट्रोल करणारी मंडळी आग पेटवून या मधमाश्यांना अक्षरशः मारून टाकतात. मात्र यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते आहे.
मधमाशा जर नाहीशा झाल्या तर ?
मधमाशा (Honey Bee) जर नाहीशा झाल्या तर त्यानंतर साडेचार वर्षात मानवी जीवन पृथ्वीवरून नष्ट होईल, असे भवितव्य प्रसिद्ध संशोधक अन्स्टाईनने वर्तवले आहे, यावरून आपल्याला मधमाश्या किती महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात येते. त्यामुळे तज्ज्ञ मधमाश्यांचे संगोपन करण्याला प्राधान्य देतात. मधासाठी पोळं न जाळता इतर प्रकारे मध घेतलं जाऊ शकते.
असं करता येईल संवर्धन
शहरात मधमाश्यांची संख्या वाढवण्यासाठी पेट्या ठेवणे तसेच त्यांना उपयुक्त झाडे लावणे, हा उपाय आहे. याशिवाय शिसव, बहावा, कांचन, जांभूळ, पळस, बोर, अशा वृक्षांची लागवडदेखील आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.
या कायद्यानुसार दंड
मधमाश्यांचे पोळ जाळल्यास किंवा त्यावर स्प्रे मारल्यास ते पर्यावरणाची हानी केल्याचे ठरते. जैवविविधता संवर्धन कायदा २०१० (बायोडायव्हरसिटी अॅक्ट) हा गुन्हा होऊ शकतो. यात रोख दंड व कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे पोळ्याला हानी न पोहोचवता मधमाश्यांना काही दिवसांचा वेळ दिल्यास ते निघून जातात, असे मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.
हेही वाचा : Climate Change : हवामान बदलाचा परिणाम; गहू, तांदूळ महाग होईल सोबत पाण्याची टंचाईही येणार