बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; परंतु ही ओळख आता हळूहळू मिटत चालली आहे. ऊसतोड कामगारांना आता गावातच कामे मिळत असल्याने ऊसतोड कामगाराच्या हाती कोयत्याऐवजी रेशीम धागा (Silk thread) आला म्हटले, तर वावगे ठरणार नाही. (Sericulture Farming)
बीड तालुक्यामध्ये एकूण ७२९ एकरांवर तुतीची लागवड केली असून, या पिकाच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम कोष उत्पादन करून आपले आर्थिक जीवनमान उंचावत आहेत. (Sericulture Farming)
पावसाचा लहरीपणा व अनियमित पिकणारी शेती याला फाटा देत बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन करत आहेत.
बीड तालुक्यातील माळापुरी, काकडहिरा, बेलखंडी पाटोदा, उमरद खालसा, नागापूर बुद्रुक, खांडे पारगाव, कामखेडा, राक्षस भुवन, कुक्कडगाव, नेकनूर सफेपूर, घाट जवळा, बऱ्हाणपूर, परभणी केसापुरी, कदमवाडी, नाळवंडी या गावांत तुती लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
विशेष म्हणजे बीड शहरातच रेशीम अंडकोष विक्रीचे विक्री केंद्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल बंगलोर किंवा कर्नाटक कडे घेऊन जावा लागत नाही.
नरेगाच्या माध्यमातून रेशीम शेती, तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वेळोवेळी जिल्हा रेशीम अधिकारी, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सूचित केले.
त्यानुसार शेळके यांनी कार्य केले. बीड तालुक्यातील माळापुरी येथील प्रगतशील शेतकरी मन्सूर बेग हे रेशीम शेतीमधून वर्षाकाठी एक एकरातून अडीच ते तीन लाख रुपये नफा मिळवतात.
२१८ किलो कोषचे उत्पादन
बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके माळापुरी येथे सोमवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे विकास मस्के, बीडचे कार्यक्रम अधिकारी मकरंद इंगोले, महादेव गिरी, संदीपान तिपाले, किशोर हाडोळे, मन्सूर बेग, लुखमन बेग, तात्याराव पडुळे, अरुण ढास उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थितांना रेशीम शेतीबाबत माहिती दिली. गणेश बडगे या शेतकऱ्यास २१८ किलो कोष उत्पादन मिळाले, त्यास प्रति किलोसाठी ७६५ एवढा भाव मिळाला.
शेतकऱ्यांना रेशीम शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असल्याने ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावातच काम मिळत आहे, ही अतिशय समाधानकारक बाब आहे. - चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड