राज्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे यासाठी महारेशीम अभियान (Mahareshim abhiyan) राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्याला रेशीम हब (Silk Hub) बनविण्याच्या दृष्टीने रेशीम विभागाचे प्रयत्न आहे.
शेतकरी (Farmer) लाभार्थीना एकरी तीन वर्षात या योजनेतंर्गत ४ लाख १८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात रेशीम शेती फायद्यात असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यासोबतच त्यांना या शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात ९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून ९ फेब्रुवारीपर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवी झेंडी दाखवून १४ जानेवारी रोजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. या अभियानादरम्यान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.
यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहायक अशोक वडवळे, रंगनाथ जांबुतकर, राजू रणवीर, रजनीश कुटे, नितीन लोलगे, केतन प्रधान, कुलदीप हरसुले, राधा पाटील, रमेश भवर, तान्हाजी परघने आदींची उपस्थिती होती.
रेशीम समग्र-२ योजना...
रेशीम संचालनालयाच्यावतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून तुती लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम, किटक संगोपन साहित्य, तुती लागवड, फळबागा, बाल किटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीनसाठी सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
रेशीम शेतीचे महत्त्व, बाजारपेठ उपलब्धता, रेशीम उद्योगासाठी विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. रेशीम उद्योग करण्यास इच्छुकांची नाव नोंदणी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी या कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी देशपांडे यांनी केले आहे.
मजुरीसाठी २.६५ लाख, तर कुशलचे १.५३ लाख अनुदान...
सन २०१७ पासून राबविल्या जात असलेल्या महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी सुद्धा अभियान आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे.