जळगाव जिल्ह्याच्या चुंचाळे (ता. चोपडा) येथे जप्त केलेले कापसाचे प्रतिबंधिक बियाणे गुजरातमधून आणल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. या पाकिटांवर कुठलीही माहिती मांडली नसताना आरोपीकडून घरबसल्या शेतकऱ्यांना गंडविण्याचा घाट रचला जाणार असल्याची माहिती उजेडात आली आहे.
चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुल खेडा रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधिक बियाण्यांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. कारवाईत १७ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचे १२७३ बनावट एचटीबीटी कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली.
या पाकिटांची कृषी विभागाने तपासणी केली. त्यात या पाकिटांवर उत्पादनाविषयी कुठलीही माहिती मांडली नसल्याचे दिसून आले. तर ९१० रुपये किमतीचे पाकीट १३०० रुपयांना विक्री करण्याचा घाट रचण्यात आला होता, ही बाब स्पष्ट झाली आहे.
गुजरात उठले शेतकऱ्यांच्या जिवावर
• गुजरातमधील बियाणाकांडातील माफिया महाराष्ट्रभर प्रतिबंधिक बियाणे पुरवठा करीत असल्याचे गतकाळात सिद्ध झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी राज्यात अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
• जळगाव, नंदुरबार, धुळे, वर्धा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरसह अन्य भागात झालेल्या कारवाईतून गुजरातमधील प्रतिबंधिक बियाण्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.
घरातूनच विक्री, परवानादेखील नाही
दरम्यान, प्रतिबंधिक बियाण्यांची विक्री करण्यासाठी संबंधित आरोपी घरीच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करीत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. परवाना नसल्यामुळे कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता सर्रास बियाण्यांची विल्हेवाट लावणारे रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती या कारवाईनंतर उजेडात आली आहे.
बियाणे खरेदी करताना परवानाधारक स्त्रोतांना प्राधान्य द्यावे. सरकारी संस्था, खासगी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या आणि प्रमाणित असलेल्या बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवड करावी. उगवण क्षमतेविषयी संशय आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. - कुरबान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव.