झाडी-झुडपांत, गवतामध्ये किंवा माळरानावर लपलेला छोटासा किडा चावल्याने 'स्क्रब टायफस' हा प्राणघातक आजार होतो. सुरुवातीला साध्या तापासारखी लक्षणे दिसतात.
त्यामुळे बहुतेक वेळा रुग्ण वेळेत डॉक्टरांकडे जात नाहीत. पण हा आजार वाढल्यास शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो आणि मृत्यू होण्याची शक्यता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचते.
राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे, व्यापक जनजागृती करण्याचे आणि प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचे आदेश दिले आहेत.
बचाव कसा कराल?
झुडपांमध्ये, गवतामध्ये काम करताना पूर्ण बाह्यांचे घट्ट कपडे वापरावेत. पायात बूट, हातात हातमोजे आणि डोक्यावर टोपी घालावी. अंगावर कीटकनाशक लोशन किंवा रिपेलंट लावल्यास किडे चावण्याचा धोका कमी होतो.
कुणाला जास्त धोका?
ग्रामीण भागात झुडपांमध्ये, गवतामध्ये किंवा शेतात दीर्घकाळ काम करणाऱ्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. शेतकरी, शेतमजूर, जंगलातील मजूर, गवत व झाडे कापणारे लोक हे विशेष जोखमीच्या गटात येतात.
आजाराची लक्षणे आणि निदान कसे?
या आजाराची सुरुवात अगदी साध्या तापापासून होते. सुरुवातीला रुग्णाला डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, थंडी वाजणे अशी लक्षणे जाणवतात. काही रुग्णांच्या शरीरावर किडा चावलेल्या ठिकाणी काळसर डाग दिसतो. हा डाग स्क्रब टायफसचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते. आजार गंभीर झाल्यास रुग्णाला श्वसनाचा त्रास होतो, रक्तदाब अचानक घटतो, मेंदूवर परिणाम होतो, मूत्रपिंड व फुफ्फुसांच्या कार्यावरही विपरित परिणाम होतो.
स्क्रब टायफस म्हणजे काय ?
'स्क्रब टायफस' हा ऑरिएंटिया त्सुत्सुगामुशी नावाच्या सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा जीवाणू गवतामध्ये आणि झुडपांमध्ये राहणाऱ्या 'माइट' नावाच्या किड्याच्या शरीरात असतो. हा किडा चावल्यावर जीवाणू मानवी रक्तप्रवाहात जातो आणि काही दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात. साध्या डास किंवा पिसू चावल्यासारखा हा चावा वाटतो, त्यामुळे लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, याच दुर्लक्षामुळे नंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनते. शेतकरी, कामगार, जंगलात जाणारे मजूर यांना हा धोका विशेषतः असतो.
३० टक्के रुग्ण वाचत नाहीत
'स्क्रब टायफस' हा उपचार न घेतल्यास जीवघेणा ठरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, या आजारामुळे मृत्यूदर सुमारे ३० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. उशिरा उपचार सुरू झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साचते, हृदय व मूत्रपिंड निकामी होऊ शकतात आणि रुग्णाला वाचवणे कठीण होते. ग्रामीण भागात वेळेत रुग्णालय गाठता न आल्यामुळे मृत्यूचे प्रमाण आणखी वाढते.
हेही वाचा : तुमच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल योग्य; जाणून घ्या कोल्डप्रेस आणि रिफाइन्ड तेलातील फरक