School Garden : श्रमदान, शिक्षकांच्या स्वखर्चातून विद्याथ्र्यांना चांगला भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शाळेच्या परिसरातच परसबाग फुलली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करणे आता सोपे झाले आहे.
मुलांना पोषणयुक्त आहाराची सवय लागावी, मुलांच्या शाळेतील आहारात पालेभाज्यांचा वापर करता यावा, या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांच्या आवारात परसबाग फुलली आहे.
यासाठी शासन किंवा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कोणताही निधी मिळाला नसून, विद्यार्थ्यांचे श्रमदान व शिक्षकांच्या स्वखर्चातून परसबाग साकारली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांबरोबरच मुलांचे आरोग्यही चांगले राहावे, कुषोषणावर मात करता यावी, पोषणयुक्त आहाराची सवय लागावी, या उद्देशातून परसबाग उपक्रम राबविण्यात येत आहे.
सन २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रात परसबागेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी मिळाला होता.
यंदा मात्र परसबागेसाठी निधीची तरतूद नाही, असे असतानाही शिक्षकांनी यंदा स्वखर्चातून परसबागेचा उपक्रम साकारला आहे.
मागील वर्षी होती १६ लाखांची तरतूद
• २०२३-२४ या वर्षात जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून प्रती परसबागेसाठी २० हजार रुपयांची तरतूद केली होती.
• २८० जिल्हा परिषद शाळांना परसबागेसाठी प्रती २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १६ लाखांचा निधी वितरीत केला होता.
• यंदा मात्र शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून परसबागेसाठी निधी मिळाला नाही.
आकडेवारी काय सांगते?
परसबाग उपक्रम | ५०० |
परसबाग नाही | २७५ |
एकूण जि.प. शाळा | ७७५ |
सेंद्रिय पद्धतीवर भर
• सेंद्रिय पद्धतीच्या परसबागेतील पालेभाज्या या आरोग्यासाठीदेखील पौष्टिक आहेत, असे उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी सांगितले.
• सेंद्रिय परसबाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ खत ही पर्यावरणपूरक खतांची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यातील ७७५ पैकी जवळपास ५०० जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या स्वयंप्रेरणेतून परसबाग उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. परसबागेत सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला आहे. - गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम