Join us
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या झळा तीव्र, उन्हाळ्यात विहिरींची कामे उरकण्यास वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 12:06 IST

पावसाळा सुरू व्हायला दोन अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यापूर्वी कामे उरकण्याची लगबग सध्या काक्रंबासह गटातील विविध गावातील विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गटात रोजगार हमी योजनेतून १४९ सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे उरकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ दिसून येत आहे.

या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये फळबाग लागवड, औषधी वनस्पती लागवड, रस्ते त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सिंचन विहिरींचाही सामावेश आहे. या वर्षी प्रथमच शासनाच्या वतीने मागेल त्याला सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे सुरू झाली आहेत. पावसाळा सुरू व्हायला दोन अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यापूर्वी कामे उरकण्याची लगबग सध्या काक्रंबासह गटातील विविध गावातील विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान आहे. यामध्ये साधारण तीन फुटांपर्यंत बांधकाम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ३५ फूट व्यास तर खोली ५० फूट आहे. या कामावर अकुशलसाठी दोन लाख ५० हजार तर कुशलसाठी एक लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून विहिरीच्या मंजुरीसाठी पळापळ करत होतो. अखेर या वर्षी विहीर मंजूर झाल्याने किमान पुढच्या वर्षी काहीतरी उत्पन्न हातात पडेल, अशी अपेक्षा आहे. - रामेश्वर घोगरे, काक्रंबा, शेतकरी

आम्हाला शेती आहे; मात्र, शेतात कामाला जाताना पिण्यासाठीही घरूनच पाणी घेऊन जावे लागत होते. त्यामुळे विहीर मंजुरीचे पत्र मिळताच खूप आनंद झाला.- माधुरी लोमटे, सलगरा (दि)

टॅग्स :पाणीकपातदुष्काळतुळजापूर