शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना राबवली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे महावितरणच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'मागेल त्याला सौर कृषिपंप' या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.
त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा 'पेड पेंडिंग'चा प्रश्न सुटणार आहे.
'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्यास त्याचा हिस्सा भरावा लागतो.
शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो. शेतात पंप बसविला जातो.
अधिक वाचा: कर्जमाफीसाठी राज्यातील बँकांकडून आकडेमोड सुरू; राज्य सरकारने बँकांना दिले 'हे' आदेश
