Join us

Sakhar Kamgar Strike : राज्य साखर कारखाना कामगारांचा संप स्थगित; काय निघाला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:14 IST

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने १६ डिसेंबर २०२४ चा साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला.

इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने १६ डिसेंबर २०२४ चा साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. ११ डिसेंबरला शासन आदेशानुसार साखर कारखाना प्रतिनिधी, कामगार संघटना प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी यांनी त्रिपक्षीय समिती गठीत करून लवकरात लवकर साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, असे सूचित केले आहे.

शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याने राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनीसुद्धा दोन्ही राज्य संघटनांना बेमुदत संप स्थगित करण्याचे आवाहन केले असल्याचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी सांगितले.

शंकरराव भोसले म्हणाले, महाराष्ट्रातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. ३१ मार्च २०२४ पासून वेतनवाढीच्या त्रिपक्षीय कमिटीच्या कराराची मुदत संपली आहे.

२७ फेब्रुवारी २०२४ रोजी नवीन मागण्यांचा मसुदा मुख्यमंत्री, सहकारमंत्री, कामगार मंत्री व साखर संघ अध्यक्ष, साखर आयुक्त पुणे व कामगार आयुक्त मुंबई यांना नोटीस देऊन कराराची मुदत संपल्याचे कळविले होते.

परंतु सरकारने कमिटी गठीत केली नाही. अनेकवेळा शासनास निवेदन व साखर आयुक्त कार्यालयावर ७ ऑगस्ट २०२४ रोजी साखर कामगाराचा मोर्चा काढूनही या गंभीर विषयाकडे शासनने लक्ष दिले नव्हते.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपाची गंभीर दखल घेऊन तातडीने त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतल्याने १६ डिसेंबरचा संप स्थगित केला आहे.

अधिक वाचा: Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराच्या बैठक लांबणीवर

टॅग्स :साखर कारखानेऊसकामगारसांगलीकोल्हापूरसंप