Join us

Safflower Farming : शेतकऱ्यांनी करडई पिकाकडे फिरवली पाठ; करडई तेल स्वस्त होणार की महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:14 IST

Safflower Farming/Safflower Oil : करडी तेलाचा वापर अल्प प्रमाणात असून, याचे उत्पादनही नगण्य आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे लागवड क्षेत्र दोन लाखांहून अधिक आहे. मात्र, यात करडीचा पेरा क्षेत्र अजूनपर्यंत निरंक आहे.

बुलढाणा जिल्ह्यात करडी तेलाचा वापर अल्प प्रमाणात असून, याचे उत्पादनही नगण्य आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे लागवड क्षेत्र दोन लाखांहून अधिक आहे. मात्र, यात करडीचा पेरा क्षेत्र अजूनपर्यंत निरंक आहे.

तेलवर्गीय पीक असलेल्या करडीला बाजारात मागणी असली तरी त्याच्या काढणीची प्रक्रिया अधिक किचकट आहे. यामुळे याची लागवड जिल्ह्यात तूर्त निरंक झाली आहे. यामुळे पुढील काळात करडीचे तेल महाग होणार आहे.

जिल्ह्यात रब्बीचा पेरा किती?

बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार लाख २६ हजार ७१८.२४ हेक्टरवर साधारणतः रब्बीचा पेरा होत असतो. यामध्ये सर्वाधिक पेरा क्षेत्र हे हरभऱ्याचे असून, १ लाख ५६ हजार ३६४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. तर गव्हाची पेरणी ४० हजार ७३०.५८ हेक्टरवर झालेली आहे; पण करडीची पेरणी ही निरंक असल्याचे दिसून येत आहे.

पाच वर्षांत करडी पेरा घटला!

तेलवर्गीय पीक म्हणून करडीला पहिली पसंती आहे. यातून मुबलक प्रमाणात तेलही उपलब्ध होते. गत पाच वर्षांमध्ये काही हेक्टरवरील करडीचे क्षेत्र असायचे; पण आता नसल्यागत आहे.

करडीचे तेल २३० रुपये किलो

बाजारात उपलब्ध असलेल्या फल्लीच्या तेलापेक्षाही करडीच्या तेलाचे दर अधिक आहेत. हल्ली बाजारात करडीचे तेल २३० रुपये किलो दराने विकले जात आहे.

करडीचा पेरा का घटला?

करडी काटेरी पीक आहे, तसेच याची मळणी फारच किचकट आहे. या पिकाचे हार्वेस्टिंग करता येत नाही. याशिवाय उगवणशक्त्ती कमी असल्याने पेरा घटला.

कमी पाण्यात पैसे देणारे पीक

करडीचे पीक कमी पाण्यात हाती येते, याला बाजारात दरही चांगला आहे: परंतु काढणी करताना काटेरी वृक्षामुळे मजूर समोर येत नाही. यातूनच करडीचे लागवड क्षेत्र कमी झाले.

कृषी अधिकारी म्हणतात...

करडीचे क्षेत्र वाढावे म्हणून कृषी विभागाकडून योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात करडीची लागवड करावी. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीलागवड, मशागत