Join us

दूध उत्पादनाचे ग्रामीण अर्थचक्र होणार गतिमान; पशुसंवर्धन विभाग सरसावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:48 IST

आगामी काळात महाराष्ट्र राज्यात केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दुग्ध उत्पादन वाढीचा उद्देश समोर ठेवून पशुसंवर्धन विभागाने पंचसूत्री कार्यक्रम अवलंबिला आहे.

अनिल भंडारी

आगामी काळात महाराष्ट्र राज्यात केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दुग्ध उत्पादन वाढीचा उद्देश समोर ठेवून पशुसंवर्धन विभागाने पंचसूत्री कार्यक्रम अवलंबिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हवामान बदलामुळे शेती व्यवसायात काहिशी अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी शेतीला पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणे गरजेचे बनले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देत त्यांच्यामध्ये पुन्हा नवी उमेद जागविण्याचा व नवीन पशुउद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग करीत आहे.

यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य आणि पशुधनाचे व्यवस्थापन ही पंचसूत्री अमलात आणण्यात येत आहे. पशुपालकांना पशुउद्योजक म्हणून त्यांचा कायापालट करण्यासाठी ही पंचसूत्री मैलाचा दगड ठरणार आहे. परंतु पशुपालकांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे.पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप 

काय मिळणार पशुपालकांना ?

पशुपैदास सुधारणा

या कार्यक्रमामध्ये आनुवंशिक सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च गुणवत्ता व उत्पादकता असलेल्या पशूची निर्मिती व त्यांच्या नवीन जातींची ओळख करून त्यांची उत्पादकता वाढविण्यात येणार आहे.

• पशुधनाचे आरोग्य

यामध्ये प्रतिबंधात्मक, प्रवर्तक, उपचारात्मक उपाययोजना करून पशुउद्योजकांना गुणवत्तापूर्ण पशुवैद्यकीय सेवा देण्याचा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

वैरण विकास

उच्च पोषणमूल्य असलेल्या पौष्टिक वैरणीची निर्मिती करणे, मुरघास, वैरणीच्या विटा, अशा स्वरुपाच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.

पशुखाद्य

उच्च पोषणमूल्य असलेल्या व पौष्टिक पशुखाद्याचा उत्पादनास व वापरास प्रोत्साहन देणे.

पशुधनाचे व्यवस्थापन

पशू व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे आणि त्यास चालना देणे.

ग्रामीण अर्थचक्र गतिमान होणार : दुग्ध उत्पादन वाढीसाठी गोपालनाची हि पंचसूत्री महत्त्वाची ठरणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजनेद्वारे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होण्यास हातभार लागणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील पशुधन (२० व्या गणनेनुसार)

२२,७६,८९७ एकूण पशुधन घटक

म्हेंस वर्ग - २,५८,४४०, गाय वर्ग -  ४,९६,३६८

टॅग्स :दुग्धव्यवसायगायबीडमहाराष्ट्रदूध