एप्रिल, मे व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी, जोरधारा व संततधार पावसाने जिल्हातील ९१ हजार ८७१ शेतकऱ्यांना ७९ हजार १५८ हेक्टर नुकसानीसाठी शंभर कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
सर्वाधिक २६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यातील पिकांचे झाले आहे. जून व जुलै महिन्यात सरासरीच्या ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला होता.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने कोणतेच पीक राहिले नसल्याचे शेतकरी सांगतात. पाच ऑगस्टपासून सुरू झालेल्या पावसाने काही दिवसाची विश्रांती घेतली मात्र आतापर्यंत सतत पाऊस पडतो आहे.
कृषी व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याप्रमाणे एप्रिल, मे व ऑगस्ट महिन्यात ९१ हजार ८७१ शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे ७९ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.
पंचनाम्यानुसार १०० कोटी ६८ लाख १२ हजार रुपये शासनाने मंजूर केले असून, एप्रिल व मे महिन्यातील नुकसानीची रक्कम आली आहे.
रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. महिन्यात ३२१ शेतकऱ्यांच्या २०७.७५ हेक्टर पिकांच्या नुकसानीपोटी ४४.५० लाख रुपये मंजूर आहेत.
मे महिन्यातील ३२,४४० शेतकऱ्यांच्या २१ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रासाठी ४० कोटी ४३ लाख ४५ हजार, तर ऑगस्ट महिन्यात ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या ५६ हजार ९६२ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ कोटी ७९ लाख १७ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
एप्रिल, मे व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पीक नुकसानीची रक्कम मंजूर झाली आहे. ती लवकरच खात्यावर जमा होईल. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ते पूर्ण करून नुकसानीची रक्कम शासनाकडे मागणी करण्यात येईल. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अधिक वाचा: 'एफआरपी' एकरकमीच द्यावी लागणार; राज्य शासनाची 'ती' मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली