बारामती : पुणे येथे आयोजित महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत राज्यातील ३० तालुक्यांतील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 'भू प्रणाम' केंद्रांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये जिल्ह्यातील उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय बारामती आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय, पिंपरी चिंचवड या कार्यालयाचा समावेश करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक संजय धोंगडे यांनी दिली.
भूमी अभिलेख विभागाअंतर्गत नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता भू-प्रणाम केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
या केंद्रातून शासनाकडून ठरविलेल्या दराप्रमाणे सिटी सर्व्हे उतारे, ७/१२, मिळकत पत्रिका, सिटी सर्व्हेकडील फेरफार नोंदी, नकाशे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
तसेच ई-मोजणी आज्ञावलीत जमीन मोजणी अर्ज भरणे, सिटी सर्व्हेकडील ऑनलाइन, फेरफार अर्ज भरणे, ई-हक्क प्रणालीतील अर्ज भरणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाइल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती धोंगडे यांनी दिली.
अधिक वाचा: पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार