Join us

Ranmodi : गाजरगवत, चुबूक काटा व घाणेरीनंतर आलंय हे नवीन तण; शेतकऱ्यांपुढे नवी डोकेदुखी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:17 IST

Ranmodi गाजरगवत, चुबूक काटा, घाणेरी तणांच्या प्रजातीनंतर आता रानमोडीने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण केले आहे. मिरज, तासगाव, जयसिंगपूर, नृसिंहवाडी, हातकणंगले आदी परिसरात यावर्षी उच्चांकी प्रमाणात रानमोडीचा फैलाव झाला आहे.

सांगली : गाजरगवत, चुबूक काटा, घाणेरी तणांच्या प्रजातीनंतर आता रानमोडीने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण केले आहे. मिरज, तासगाव, जयसिंगपूर, नृसिंहवाडी, हातकणंगले आदी परिसरात यावर्षी उच्चांकी प्रमाणात रानमोडीचा फैलाव झाला आहे.

तिच्या उच्चाटनासाठी नेमकी औषधे किंवा संशोधन शेतकऱ्यांपर्यंत अद्याप आलेले नाही, त्यामुळे शेतकरी आपल्या परीने निपटारा करीत आहेत. रानमोडी हे अतिशय झपाट्याने वाढणारे अनेक खोडांचे झुडूप आहे.

सुमारे अडीच मीटरपर्यंत त्याची वाढ होते. सावली व आर्द्रतेत वेलीसारखी दिसते. जवळच्या झाडाच्या आधाराने वाढ होत राहते.

अनुकूल वातावरणात दिवसाला तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त वेगाने वाढते. पाने चुरगळल्यावर उग्र गंध येतो, त्यामुळे ‘तीव्रगंधा’ असेही म्हणतात.

बिया केसाळ असल्याने वाऱ्यामार्फत प्रसार होतो. साहजिकच एखाद्या शेतात तिची उगवण झाल्यास शेजारच्या शेतात सहजपणे फैलावत असल्याचा अनुभव आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. रस्त्याकडेला, पडीक शेतात, दुर्लक्षित गवताळ रानात रानमोडी आढळू लागली आहे.

रब्बी पिकांसाठी मारक▪️मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या प्रा. कांचन सुतार यांनी रानमोडीवर संशोधन केले.▪️रानमोडी आपल्या शेजारी अन्य वनस्पती सहसा उगवू देत नाही, त्यामुळेच ती पिकांसाठी हानिकारक ठरू लागली आहे.▪️नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये तिची वाढ होते. हा कालावधी म्हणजे रब्बीचा हंगाम आहे. स्वाभाविकरीत्या रब्बीच्या पिकांसाठी ती उपद्रवकारक ठरली आहे.▪️ती विशिष्ट रसायने निर्माण करते, त्यामुळे आजूबाजूचे देशी वृक्ष, वनस्पती, पिकांची वाढ खुंटते. पुनरुत्पादन, बीज उगवण थांबते.▪️गेल्या सुमारे २५ वर्षांत प्रथमच यंदा रानमोडी सर्वत्र अफाट वेगाने वाढताना दिसत आहे.

रानमोडीचे झुडूप मुळासकट उपटून टाकणे हाच तिच्या फैलावावरील उपाय आहे. सध्या तिच्या बियांचा प्रसार अद्याप झालेला नाही. तत्पूर्वीच तिच्यावर नियंत्रण शेतकऱ्यांनी करावे. - प्रा. कांचन सुतार, मिरज

अधिक वाचा: Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

टॅग्स :शेतीशेतकरीपीकरब्बीसांगली