पारंपरिक पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी रब्बी हंगामातील पिकात फेरबदल केले असून, गहू, हरभरा, ज्वारीबरोबरच राजमा पिकाला प्राधान्य दिले आहे.
हरभऱ्याला हा योग्य पर्याय असल्याने यंदा हजारो हेक्टरवर राजमा पिकाची पेरणी झाली आहे. गतवर्षीही राजमा पिकाची पेरणी झाली होती. सध्या राजमाचे पीक जोमात आल्याचे दिसते आहे.दरवर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या पारंपरिक पिकामध्ये आतबट्ट्यात जात आहे. पारंपरिक पिकांच्या उत्पन्नात वर्षानुवर्ष मोठी तूट निर्माण होत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
गतवर्षी हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, बाजारात हरभऱ्याला अत्यंत कमी भाव मिळाला. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक व निव्वळ उत्पन्नात मोठी तफावत होती. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी दोन वर्षांपासून राजमा पिकाकडे वळला आहे. यंदा यामध्ये वाढ झाली असून, हजारो हेक्टरवर राजमा पिकाची पेरणी गेली आहे.
हरभऱ्याप्रमाणेच कमी कालावधीमध्ये राजमा काढणीला येतो. हॉटेल, ढाबे यासह इतर खानावळीच्या ठिकाणी राजमाच्या भाजीला मोठी मागणी आहे. यामुळे बाजारात भाव मिळत आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकामध्ये फेरबदल करून उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी राजमाची पेरणी केली आहे. राजमा हे कमी कालावधीत येणारे पीक असून, कमी पाण्यावर काढणीला येते. यामुळे आगामी हंगामात राजमा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजम्याला मिळतो चांगला भाव...
• गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे उत्पन्न घेतले. त्या तुलनेत शेतकऱ्यांना हरभऱ्याला भाव मिळाला नाही. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकासह काढणी, मळणीसाठी मोठा खर्च करावा लागला.
• यामुळे शेतकरी आतबट्ट्यात राहिला. मात्र, गतवर्षी राजम्याची खरेदी व्यापाऱ्यांनी गावागावात करून प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपयांपर्यंत दर दिला होता.
गतवर्षापेक्षा यंदा जिल्ह्यातील विविध भागात राजमा पिकाची पेरणी झाली आहे. योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा पीक घेतले आहे. हरभऱ्यापेक्षा कमी कालावधीत राजमा येतो. यामुळे उत्पादन खर्चही कमी होतो. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
पारंपरिक पिकांमुळे शेतकरी दरवर्षी आतबट्ट्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून पारपरिक पिकांना फाटा देऊन पिकांमध्ये फेरबदल करण्याची गरज आहे. सध्या बहुतांश शेतकरी हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा पीक घेतात. राजम्याला हरभऱ्यापेक्षा चांगला भाव मिळतो. - सुरेंद्र झांबरे, शेतकरी, सुर्डी.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश