Join us

ऊस वाहतूक वाहनांना रेडिअम, रिफ्लेक्टर लावा, नाहीतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 12:15 PM

सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे व मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे.

सोलापूर : जिल्ह्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आता ग्रामीण पोलिस विविध उपाययोजना, वाहतूक नियमांची जनजागृती, प्रचार, प्रसार वाढविण्यात आला आहे. सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने वाढली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पुढे व मागील बाजूस रेडिअम, रिफ्लेक्टर लावावे असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

चालू कारखाने यांना जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रेलर, ट्रक, बैलगाडी व इतर सर्व वाहनांना लाल पांढरे रिफ्लेक्टर लावून घेण्याबाबत सांगण्यात येत आहे. तसेच सर्व वाहनांची कागदपत्रे अद्ययावत असतील याची खात्री करावी. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे याबाबत वाहन चालक व मालक यांना साखर कारखानदारांकडून सूचना देण्यात याव्यात असेही वाहतूक शाखेने कळविले आहे. ऊस वाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनावर रिफ्लेक्टर अथवा रेडिअम लावावे.

वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम सुरुमागील वर्षी गळीत हंगामात पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्याा सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४ हजार ३३४ एवढ्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले होते. तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, संबंधित पोलिस ठाणे यांनी कारखाना स्थळावर जाऊन वाहन चालक व मालक यांचे प्रबोधन केले होते. चालू वर्षी सर्व साखर कारखाने यांना सूचनापत्र दिले असून रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहीम ११ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :ऊससाखर कारखानेसोलापूरपोलिसवाहतूक पोलीसअपघात