Pune : पुणे जिल्ह्यातील सासवड येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरंदर हायलँड्स या शेतकरी उत्पादक कंपनीने दिल्लीत डंका वाजवला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या इंडिया एसएमई फोरमकडून देण्यात येणारा 'बेस्ट MSME' अवॉर्ड या कंपनीला मिळाला असून येथील शेतकऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.
दरम्यान, पुरंदर हायलँड्स या शेतकरी उत्पादक कंपनीने आत्तापर्यंत एकाही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही. पण या कंपनीने जगातील पहिला पेटंटेड अंजिराचा ज्यूस बनवला असून जगाच्या बाजारपेठेत पोहोचवला आहे. थेट शेतकऱ्यांकडून अंजीर, सिताफळ, जांभूळ, स्ट्रॉबेरीची खरेदी करून यापासून ज्यूस, जाम अन् ब्रेडस्प्रेड बनवण्याचे काम पुरंदर हायलँड्स करते.
इंडिया एसएमई फोरमकडून २७ हजार ४६७ अर्जांमधून पुरंदर हायलँड्सची निवड करण्यात आली असून या प्रतिष्ठित पुरस्काराने पुन्हा एकदा या कंपनीचे कार्य अधोरेखित झाले आहे. कंपनीचे फायनान्शिअल व नॉन फायनान्शिअल पॅरामीटर्स तपासून हा अवॉर्ड दिला गेला असून ६ मार्च रोजी दिल्लीतील लीला पॅलेस येते एसएमई फोरमकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आम्ही पहिल्यापासूनच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहोत. शेतकऱ्यांच्या लोकल उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत जागा मिळावी म्हणून आम्ही अंजिराचा ज्यूस बनवला आणि तो जागतिक पातळीवर पोहोचवला. शेतकऱ्यांच्या या कंपनीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्याने आम्हाला आनंद आहे.
- अतुल कडलग (संचालक, पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनी)