Pune : पुणेकरांना थेट विदर्भातील शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदीची सुवर्णसंधी मिळाली असून कोथरूड येथे आजपासून संत्रा महोत्सवाची सुरूवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून संत्रा उत्पादक शेतकरी आणि संत्रा खरेदीदार यांच्या हस्ते फीत कापून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संत्रा महोत्सवात नागपूर व अमरावती भागातील एकूण ५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून मृग बहारातील साधारणपणे २५ टन संत्रा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. महोत्सवात साधारणपणे साईजनुसार ८० ते १०० रूपये प्रति किलो दराने संत्र्यांची विक्री केली जात आहे. सदर संत्रा हा मृग बहारातील असून, चवीला गोड आहे. महोत्सवात संत्र्या सोबत फ्रेश ज्युस व इतर उत्पादने महोत्सवातील २५ स्टॉलवर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत आंबा, संत्रा, द्राक्षे, काजु, गुळ, बेदाणा, मिलेट्स अशा विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागे असतो.
कुठे आणि कधीपर्यंत आहे महोत्सव?
पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव असणार असून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.