Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांत छाटणी खोळंबली तर छाटलेल्या द्राक्षबागा वांझ.. उत्पन्न ७० टक्क्यांनी घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:19 IST

तब्बल तीन महिन्यांपासून द्राक्षबागांमध्ये साचलेले पाणी आणि अतिवृष्टी याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे. सततच्या पावसामुळे एरव्ही ३० टक्केपर्यंत होणारी फळछाटणी अद्याप दोन टक्केदेखील झालेली नाही.

दत्ता पाटीलतासगाव : तब्बल तीन महिन्यांपासून द्राक्षबागांमध्ये साचलेले पाणी आणि अतिवृष्टी याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे. सततच्या पावसामुळे एरव्ही ३० टक्केपर्यंत होणारी फळछाटणी अद्याप दोन टक्केदेखील झालेली नाही.

पावसाच्या अतिरेकामुळे उत्पन्नात ७० टक्केपर्यंत घट येणार आहे. यंदाही द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहे. मात्र, खरिपाच्या नुकसानीकडेच दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला द्राक्षबागांची कैफियत समजणार कशी? हा प्रश्न आहेच.

तासगाव तालुक्यात तब्बल २४ हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. द्राक्षाची फळछाटणी सरासरी ऑक्टोबर महिन्यात होत असली तरी १५ ऑगस्ट नंतरच तासगाव तालुक्यात फळछाटणीला सुरुवात होते.

१५ सप्टेंबरपर्यंत सुमारे ३० टक्के द्राक्षबागांची फळछाटणी झालेली असते. लवकर फळछाटणी घेतलेल्या द्राक्षांना चांगला दर मिळतो. या उद्देशानेच हंगामपुर्व फळछाटणी घेतली जाते.

तब्बल तीन महिन्यांपासून तासगाव तालुक्यात पावसाने कहर केला आहे. द्राक्षबागातून अद्यापही पाणी वाहत आहे. बागेसाठी घातलेली रासायनिक आणि सेंद्रिय खते वाहून गेली आहेत.

द्राक्ष काडी परिपक्व होण्याच्या अवस्थेतच पावसाला सुरवात झाल्यामुळे काडी परिपक्व झाली नाही. पुरेशा प्रमाणात औषध फवारणी झाली नसल्यामुळे बहुतांश द्राक्षबागांची पानगळ झाली आहे. तीन महिन्यांपासून द्राक्षबागेतील झाडांच्या मुळीची वाढ थांबली आहे.

ओलांड्याला मुळ्या सुटलेल्या आहेत पानगळ होऊन फुटवे निघत असूनही, मुळी थांबल्यामुळे फळछाटणी घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे द्राक्ष हंगाम लांबणीवर पडणार आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात दोन ते तीन टक्केच बागांची फळछाटणी झाली आहे.

छाटणी केलेल्या बागात द्राक्षघडांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा खरड छाटणी केल्याचेही पाहायला मिळत आहे. छाटलेल्या बागातून सरासरीपेक्षा ७० टक्के द्राक्ष घडांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यंदा फळ छाटणीअभावी बागा सोडून देण्याची वेळ आली आहे.

खरड छाटणीपासूनचा एकरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्चही बागायतदारांना कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. प्रशासनाने नदीकाठच्या भागातील पंचनामे केले. मात्र, तासगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीकडे डोळेझाक केली. त्यातच बागांचे नुकसान तत्काळ नजरेत न येता दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. परिणामी, द्राक्षउत्पादक संकटात सापडले आहेत.

द्राक्ष बागेची दरवर्षी आगाप फळ छाटणी करतो. मात्र यंदा फळ छाटणी केलेल्या बागेत घडांची संख्या कमी आहे. गोळी घड मोठ्या प्रमाणात आहे. यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्पन्नात ७० टक्के घट येणार आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. द्राक्ष बागायतदारांना एकरी दीड ते दोन लाख रुपयांची मदत करायला हवी. - अंकुश माळी, द्राक्ष बागायतदार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव

टॅग्स :द्राक्षेशेतकरीसांगलीशेतीपाऊसतासगाव-कवठेमहांकाळफलोत्पादन