विजय सरवदे
यंदाच्या अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ५३६ विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने प्रत्येकी ३० हजारांच्या अनुदानानुसार १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे.
या निधीतून विहिरी दुरुस्त झाल्यास अनेक गावांच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकांबरोबर विहिरींचेही मोठे नुकसान झाले आहे. काही विहिरी पुरामुळे खचल्या आहेत, तर अनेक विहिरी, मोटारपंप बुजले आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तांत्रिक अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन विहिरींची स्थळ पाहणी व पंचनामे केले. दुरुस्तीसाठी अंदाजपत्रके तयार केली. यातूनच मराठवाड्यात ५ हजार ३३०, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५३६ विहिरींचे नुकसान झाल्याची आकडेवारी आहे.
दरम्यान, शासनाने विहिरींच्या दुरुस्तीसाठी विभागीय आयुक्त स्तरावर अनुदानाची रक्कम जमा केली असून जि.प.च्या रोजगार हमी योजना विभागाने जिल्ह्यातील बुजलेल्या, खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयातील रोजगार हमी विभागाच्या उपायुक्तांकडे सादर केला.
दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करण्यात यावे, ज्यामुळे खरिप पिकांना तरी जीवदान मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सध्या तरी तीस हजार रुपयांपैकी प्रथम १५ हजार रुपयांचे अनुदान हे आगाऊ स्वरूपात दिले जाणार आहे.
हे अनुदान देताना संबंधित शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. या विहिरींचे दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटोदेखील बंधनकारक करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त विहिरींची तालुकानिहाय स्थिती
| तालुका | विहिरी |
| सिल्लोड | १२९ |
| गंगापूर | ९८ |
| पैठण | ९८ |
| कन्नड | ९७ |
| सोयगाव | ४५ |
| खुलताबाद | ३२ |
| वैजापूर | २१ |
| छ. संभाजीनगर | ११ |
| फुलंब्री | ०५ |