चिमणी म्हणजेच चिऊताई हिची ओळख पूर्वी बालपणात होत होती. म्हणजे लहान बाळाला भरविताना 'हा घास चिऊचा, हा घास काऊचा, असे म्हणत. खरोखरच मऊ भाताचा एक घास चिमणीता टाकला जात होता व तीही न घाचरता अगदी जवळ येऊन ते अन्न टिपायची.
तिच्या त्या सुंदर हालचाली व मंजुळ चिवचिवाट ऐकत बाळाला भरवणे पूर्ण व्हायचे आणि बालपण समृद्ध व्हायचे; पण आता बघता-बघता विकासाच्या झंझावातात ही चिऊताई आपल्यापासून दूर उडून केली आहे.
आजकाल पालक लहान बाळाला भरविताना मोबाईलवर अंग्री बर्ड दाखवतात आणि मोठ्या अभिमानाने सांगतात की, हा मोबाइलशिवाय जेवतच नाही. येथून त्या बाळाची आणि मोबाईलची घातक मैत्री होऊन भविष्यातील दुष्टचक्र सुरू होते. त्यासाठी हे थांबविणे गरजेचे आहे.
चिमणी हा आपल्या घराजवळ सहन दिसणारा लहान पक्षी आहे, तिचा चिवचिवाट वातावरणात आनंद निर्माण करतो; परंतु गेल्या काही वर्षांत चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चिमणी सहसा माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करते. घरांच्या छपरात, भिंतींच्या फटीत किंवा कौलांखाली ती आपले घरटे बांधत असे.
पण आजकाल मातीची घरे राहिली नाहीत. तसेच पूर्वी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे घरे एकाच झटक्यात पूर्ण बांधली जात नव्हती; ती टप्याटप्याने बांधली जात होती. अनेक घरांना बाहेरून प्लास्टर होत नसे. भिंतीच्या चिटांमध्ये बांबू बांधण्यासाठी ज्या खोबण्या असायच्या, त्यांत चिमणी हमखास घरटे बांधायची. याशिवाय पूर्वी घरातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी खिडक्यांच्या वर किंवा स्लॅबच्याखाली छोट्या खिडक्या असायच्या.
त्या नेहमी उघड्या असायच्या. त्यामधून चिमणी हक्काने घरात येऊन पंख्यावर, ट्यूबलाइटवर किंवा कोनाडयात आपला संसार थाटायची. पण आता आर्थिक सुबत्ता आती आणि घरे एकाच दमात पूर्ण व्हायला लागली. एसी आल्यामुळे छोट्या खिडक्यांची जागा स्लाइडिंग विंडोने घेतली आणि चिमणीसाठी आपल्या घरात व मनात जागाच राहिली नाही.
चिमण्या धान्याचे दाणे, किडे-मुंग्गा आणि छोटे कीटक खातात. त्यामुळे त्या शेतीसाठी खूप उपयुक्त ठरतात. चिमण्यांचे निसर्गात मोठे महत्त्व आहे. त्या कीटक खाऊन पिकांचे संरक्षण करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होते. तसेच त्या बियाणे पसरवून नवीन झाडे उगवण्यास मदत करतात.
चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे परिसर आनंदी व जिवंत वाटतो. चीनमध्ये एकदा चिमण्यांबाबत घडलेली घटना याचे महत्त्व दाखवून देते. तेथे चिमण्या धान्य खातात म्हणून त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला; परंतु त्यानंतर शेतातील किड्यांची संख्या प्रचंड वाढली आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.
नंतर संशोधनातून चिमणीचे महत्त्व लक्षात आल्यावर दुसऱ्या देशातून चिमण्यांची आयात करून त्यांचे संवर्धन केले गेले. चिमणीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. म्हणूनच चिमणी हा निसर्गातील अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. निसर्गातील प्रत्येक जिवाचे महत्त्व अनन्यसाधारण असते, हे लोकांच्या लक्षात आले पाहिजे. निसर्गातील संतुलन टिकवण्यासाठी प्रत्येक जीव आवश्यक असतो. त्यामुळे चिमण्यांचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे.
यासाठी आपण काही सोप्या उपाययोजना करू शकतो. घराच्या गॅलरीत किंया अंगणात चिमण्यांसाठी बाराही महिने मातीचे पसरट पाण्याचे भांडे ठेवावे, दर आठवड्याला या भांडयामधील शेवाळ व कचरा काडून ते स्वच्छ करावे. अंगणातील इंच इंच जागेचे कॉक्रीटीकरण करू नये, काही भागांत माती ठेवावी, जेणेकरून चिमणी त्यामध्ये धूळ अंघोळ करू शकेल.
घराच्या अंगणात, गॅलरीत, व्हरांड्यात, वॉशिंग स्पेसवरील छपरावर किंया सोलर पॅनलच्या खालील अँगालवर चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी लाघावीत. घरातील जुने सुतळीचे पोते फाडून त्याचे तुकडे करावेत व त्यातील सुतळी चोडी विरळ करून ती एखाद्या ठिकाणी लटकवून ठेवावी, जेणेकरून तिला घरट्यासाठी साहित्य मिळेल.
घराच्या परिसरात बकुळ, तगर, जांभूळ किंवा बोगनवेल लावावीत. चिमण्या फांद्या दाट असलेल्या झाडांमध्ये जास्त आढळतात. या गोष्टी केल्यास चिमण्यांना सुरक्षित वातावरण मिळू शकते. आज मोबाईलवर चिमणी संवर्धनाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत; आता गरज आहे ती फक्त कृती करण्याची.
भविष्यात जर नवीन पिढीला समृद्ध जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा व पाणी द्यायचे असेल, तर आज पुन्हा चिमणीला आपल्या अंगणात आणावे लागेल; कारण त्याच चिऊताईच्या माध्यमातून नवीन पिढीची नाळ निसर्गाशी जुळवता येते आणि त्यांच्या मनांमध्ये निसर्गसंवर्धनाच्या संस्कारांचे बीज रुजवता येते.
मोबाइलमध्ये मान खाली घालून नाही, तर ताठ मानेने जगण्याचा मार्ग फक्त चिऊताईच दाखवू शकते. तेव्हा या 'चिमणी दिना'ला चिमणी संवर्धनाची कृती करा आणि आपाल्या पाल्यांचे भविष्य समृद्ध करा... नाहीतर चिमणीही भुर्रकन नष्ट व्हायला वेळ लागणार नाही...
अमोल सावंत
निसर्ग कट्टा तथा कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र पक्षिमित्र.
