Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने दानापुरात पिकांना जबर फटका; केळी बागा उद्ध्वस्त झाल्याने लाखोंचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:05 IST

दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

राजू शेख

अकोला जिल्ह्याच्या दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

वादळामुळे अनेक शेतांमधील केळीची झाडे मुळासकट उखडली गेली, तर काही ठिकाणी घडांसह झाडे मोडून पडली. त्यामुळे उत्पादनासाठी लागणाऱ्या महिन्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे.

केळीशिवाय मका, ज्वारी, भुईमूग, मिरची, टमाटर या पिकांचेही अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे. शेतकरी निखिल मिसाळ, सोपान महाले, भगवान ढगे, गिरीधर हागे आर्दीच्या शेतांमध्ये झाडांवरचे घड मोडून जमीनदोस्त झाल्याचे दृश्य पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

शेतकऱ्यांनी कर्ज व कर्जावरील व्याजाचा विचार करत केलेली गुंतवणूक एका रात्रीत मान्सूनपूर्व पावसाने उद्ध्वस्त केल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काढणीस तयार भुईमूग पावसामुळे भिजल्याने खराब झाला, तर गुरांसाठी साठवलेला चारा व कुटारही वापरण्यायोग्य राहिला नाही. पुंडलिक घायल यांच्या शेतातील झोपडीवरील टिनपत्रे उडून गेले, तर वीज वितरणासाठी लावलेली डीपी कोसळली आहे.

तसेच दानापूर-हिगणी रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या संपूर्ण घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : अमृतफळ आंबा आहे विविध आजारांवर गुणकारी; साल, मोहोर, फळ, पाणे, सर्वांचे आयुर्वेदात महत्त्व

टॅग्स :पाऊसशेती क्षेत्रशेतकरीशेतीपीककेळीअकोलाविदर्भ