Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता१५ हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी दिली.
शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकीच अर्थात सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.'
‘शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे, तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे, यासाठी गट शेती, अवजारांची बँक, शाश्वत सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी अग्री बिझनेस सोसायटी आदी योजना-उपक्रम राबविण्यात येत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.