Pik Vima : बीड जिल्ह्यात बोगस पिक विमाचा प्रकरण सध्या चर्चात असतानाच आता परळी येथे एक अजबच प्रकार उघडकीस आला आहे. जमीन एकाची अन् पीक विमा काढला दुसऱ्यानेच असे प्रकार उघडकीस आले आहे.
दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर पिकाचा विमा काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पांगरी येथील एका शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून परळीतील दोन मल्टी सर्व्हिसेस चालक आणि दोन शेतकरी अशा एकूण चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात १३ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पांगरी येथील रवींद्र दामोदर मुंडे यांनी त्यांच्या जलालपूर येथील आसावरी मल्टी सर्व्हिसेस येथुन जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पीकविमा भरला होता. त्यामुळे अंगद मुंडे यांचा पीक विमा रद्द करण्यात आला व त्यांना मिळणारा ९२ हजार रुपयांचा पीक विम्याचा चेक मिळाला नसल्याची बाब समोर आली.
चौघांविरुध्द गुन्हा दाखल
यामुळे अंगद मुंडे यांची फसवणूक व नुकसान झाले. अंगद मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून मधुकर भगवानराव भारती, रवींद्र दामोदर मुंडे (दोघेही रा. लिंबुटा), धनराज उत्तम चौधर (रा. लोकरवाडी), कौसाबाई लक्ष्मण राठोड (रा. पांगरी तांडा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरु आहे.
बोगस पीक विमा प्रकरण
गावातील दुसरे शेतकरी अशोक किसनराव मुंडे यांच्या नावाच्या शेत गट क्रमांक ७६ मध्ये धनराज उत्तम चौधर यांनी केदारेश्वर मल्टी सर्व्हिसेसमध्ये कौसाबाई लक्ष्मण राठोड, रा. पांगरी तांडा यांचा पीक विमा भरला. त्यामुळे अशोक मुंडे यांचाही पीक विमा रद्द झाला. असे बोगस प्रकार गावात अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले आहेत.
जमीन अंगद मुंडेंची विमा भारतींचा
२०२२, २०२३ या वर्षामध्ये पांगरी शिवारातील गट क्रमांक ३९ मध्ये सोयाबीन पिकाचा सात एकर तीन गुंठ्याचा पीक विमा पांगरी येथील शेतकरी अंगद गणपतराव मुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने भरला होता. त्यानंतर काही दिवसांनी पांगरी गावात पीक विमा कंपनीचे अधिकारी आले व अंगद मुंडे यांना भेटून पीक विमा डबल का भरला, असे विचारले.
अंगद मुंडे यांनी आपण डबल पीक विमा भरला नसल्याचे स्पष्ट केले. गट क्रमांक ३९ मध्ये मधुकर भगवानराव भारती (रा. लिंबुटा) यांनीही पीक विमा भरला असल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अंगद मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून विमासंदर्भात माहिती प्राप्त केली.